दैनिक स्थैर्य । दि. २४ जून २०२२ । पलूस । शालेय अभ्यासक्रमातील मराठी विषयांच्या पाठ लेखकांबद्दल शालेय विद्यार्थ्यांनी वाचलेले असते. पाठातील मजकुराबाबत मुलांच्या मनामध्ये कुतूहल, जिज्ञासा ,आदरभाव निर्माण झालेला असतो. पाठावरील स्वाध्याय विद्यार्थ्यांनी सोडवलेला असतो अन कधी कधी मुलांच्या मनामध्ये असा प्रश्न उपस्थित होतो की या पाठाचे लेखक कोण असतील?ते कधी आपल्याला भेटतील का?आपल्याशी बोलतील का?आपल्या प्रश्नांची उत्तर देतील का?आमचे सर,मँडम लेखकांना कधी शाळेत आणतील का?अशा अनेक प्रश्नांचे मोहोळ घेऊन विद्यार्थी शाळेत येत असतात. परंतु एखादा दिवस असा येतो की अचानकपणे शाळेत आपण ज्या वर्गात शिकत आहोत त्या वर्गातील असणार्या मराठी विषयाच्या एका पाठाचे लेखक प्रत्यक्ष शाळेत येतात. माझ्याशी बोलतात.मला सही देतात.मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देतात. कौतुक करतात असा अनुभव जर विद्यार्थ्यांना आला तर त्या सारखा मोठा आनंद शाळेला नसतो. अशीच घटना आज पलूस येथील जिल्हा परिषद शाळा नं.१, जिल्हा परिषद शाळा नं.२,जिल्हा परिषद शाळा नंबर ३ मध्ये घडली. जिल्हा परिषद शाळा नं.२ पलूस मधील उपक्रमशील शिक्षक मारुती शिरतोडे यांनी ‘लेखक आपल्या भेटीला’ या उपक्रमातर्गत आज इयत्ता सहावीच्या मराठी विषयातील ‘पण थोडा उशीर झाला’ या पाठाचे लेखक संदीप हरी नाझरे यांना शाळेत येण्याचे निमंत्रण दिले.त्याप्रमाणे नाझरे सर प्रत्यक्ष आज या तीनही शाळात आले आणि मुलांशी,शिक्षकांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे दिली आणि ते मुलांच्यात रमले. योगायोगाने आजच लेखक संदीप नाझरे यांचा वाढदिवस सुद्धा होता त्यामुळे तिने शाळांच्या वतीने त्यांचा सत्कार करून केक कापला आणि त्यांना वाढदिवसाच्या भरभरुन शुभेच्छा दिल्या. त्यांच्यासोबत दैनिक पुढारी चे तालुका प्रतिनिधी तुकाराम धायगुडे आणि जाहिरात विभाग व्यवस्थापक पाटील साहेब उपस्थित होते.यावेळी बोलताना संदिप नाझरे म्हणाले आपल्याला शिक्षण आणि पक्षी निरीक्षण आणि सामाजिक कार्य याची आवड असून मुलांनी शालेय वयापासूनच अवांतर पुस्तके वाचली पाहिजेत आणि आपल्या आजूबाजूच्या घटना, प्रसंग, परिसर ,भूगोल ,इतिहास समजून घेतला पाहिजे. कार्यक्रमाचे स्वागत तंत्रस्नेही शिक्षक बाळासाहेब खेडकर यांनी केले. लेखकाचा परिचय आणि प्रास्ताविक मारुती शिरतोडे यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार जिल्हा परिषद शाळा नंबर एकचे वरिष्ठ मुख्याध्यापक राम चव्हाण यांनी मानले. या कार्यक्रमास शाळा नंबर 2 पलूस च्या वरिष्ठ मुख्याध्यापिका उज्ज्वला पाटील,शाळा नं.3च्या प्र-मुख्या.वंदना सनगर, पंचायत समिती गटसाधन केंद्राकडील विषयतज्ञ जयकर कुटे,तिन्ही शाळातील शिक्षक संगीता पाटील, शैलजा लाड ,सुनीता पवार ,विशाखा ढेरे, स्मिता लाड, वनिता कांबळे ,संभाजी पाटील,जगन्नाथ शिंदे आणि सर्व विद्यार्थी उपस्थित होते.