
स्थैर्य, औरंगाबाद, दि. ७: कोरोनाचा कहर असे वृत्त काही प्रसारमाध्यमांत झळकले. तोच धागा पकडून एका चॅनलने सोमवारपासून लॉकडाऊन अशी बातमी दिली. त्यामुळे अफवांचे पीक पसरले. बाजारात प्रचंड गर्दी उसळली. मात्र, लॉकडाऊन लावायचा की नाही, याचा निर्णय रविवारी (७ मार्च) रात्री आठ वाजता होणार आहे. रविवारी सायंकाळी ५ वाजता जिल्हा टास्क फोर्सची बैठक जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली होईल. त्यात लॉकडाऊन लावणे अत्यंत गरजेचे असल्यास तो कधी, कोणत्या भागांसाठी आणि किती वेळ लागणार हे ठरणार आहे. लोकांच्या डोक्यात दगड घातल्यासारखा लॉकडाऊन असणार नाही. मात्र, या वेळी नियमांची कडक अंमलबजावणी होईल, असे चव्हाण यांनी स्पष्ट केले. दरम्यान, भाजप, मनसेने लॉकडाऊनला विरोध केला आहे.
मृत्यूंचे प्रमाण तुलनेने कमी असले तरी गेल्या तीन आठवड्यांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. ते रोखण्यासाठी मनपा प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. मात्र, अनेक नागरिक मास्क लावूनच घराबाहेर पडण्याचा नियम पायदळी तुडवत आहे. हॉटेल्स, रेस्टॉरंटमध्ये गर्दी होत आहे. त्यामुळे लॉकडाऊनशिवाय पर्यायच नाही, या निष्कर्षावर वरिष्ठ अधिकारी येत आहेत.
अधिकारी हैराण… पण मानसिकता तयार करणे सुरू
लॉकडाऊनच्या अफवेने मनपा प्रशासक आस्तिककुमार पांडेय, पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता आणि रजेवर असलेले जिल्हाधिकारी सुनील चव्हाण हैराण झाले. सुटीचे पूर्वनियोजन रद्द करून रविवारीच रुजू होणारे चव्हाण यांनी ६ मार्च रोजी सायंकाळी पत्रक प्रसिद्धीस दिले. त्यात त्यांनी सोमवारपासून लॉकडाऊन ही बातमी खरी नसल्याचे स्पष्ट केले. माझ्या अध्यक्षतेखाली रविवारी जिल्हा टास्क फोर्सची बैठक होऊन निर्णय घेतला जाईल. दरम्यान, एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, पुढील आठवड्यात लॉकडाऊन लागू शकतो. त्यासाठी लोकांची मानसिकता तयार करणे सुरू आहे.
फैलाव थांबणार नाही, लोकांचे हाल होतील
लॉकडाऊनमुळे कोरोनाचा फैलाव थांबणार नाही. उलट हातावर पोट असणाऱ्या लोकांचे हाल होतील, असे भाजपचे आमदार अतुल सावे, एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी सांगितले. मनसेचे राज्य उपाध्यक्ष सुमीत खांबेकर, राजू जावळीकर यांनी लॉकडाऊनला विरोध दर्शवला. त्याऐवजी मनपाचे बाजारपेठांत सॅनिटायझरचे स्पॉट उभे करावेत, विनामास्कविरोधी कारवाई वाढवावी, सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी घालावी, अशी मागणी केली. सिडको प्रगती व्यापारी संघटनेचे अध्यक्ष बद्रीनाथ ठोंबरे यांनीही गरीब जनता, व्यापाऱ्यांचा विचार करावा, अशी सूचना केली आहे.
लोकांना पुरेसा वेळ देऊ
लॉकडाऊन लावण्यासारखी स्थिती आहे. मात्र टास्क फोर्स बैठकीतच अंतिम निर्णय होईल. सर्वकाही बंद अशा स्थितीला सामोरे जाण्यासाठी लोकांना पुरेसा वेळ देऊ. – आस्तिककुमार पांडेय, मनपा प्रशासक
…तर जागतिक स्तरावर नाव खराब होईल
पुन्हा लॉकडाऊन लागला तर जागतिक पातळीवर औरंगाबादचे नाव खराब होईल. उद्योग जगातील आयातदार दुसरा पर्याय शोधतील. त्यामुळे मनपा, पोलिसांनी मास्क सक्ती करावी. लॉकडाऊन हा उपाय नाही हे आता समजून घेतले पाहिजे. -ऋषी बागला, माजी अध्यक्ष, सीआयआय
आधी मुंबई बंद करा
यापूर्वीच्या लॉकडाऊनने अर्थव्यवस्था कोलमडली होती. त्याची पुनरावृत्ती होऊ नये आणि लॉकडाऊन करायचाच असेल तर मुंबई, सर्व महाराष्ट्र बंद करा. औरंगाबादच का? – मानसिंग पवार, माजी अध्यक्ष, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड अॅग्रिकल्चर
शनिवारी कोरोनाचे ४४० रुग्ण, ५ मृत्यू
जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी कोरोना रुग्णांची संख्या ४०० पार गेली. शनिवारी ४४० नवे रुग्ण आढळले, तर पाच जणांचा मृत्यू झाला. यामुळे एकूण बाधितांची संख्या ५२,५४३ झाली. मृत्यूंचा आकडा १,२८९ वर पोहोचला आहे. शनिवारी ३८६ जणांना सुटी देण्यात आली. त्यामुळे कोरोनामुक्त होऊन घरी परतलेल्यांची संख्या ४८,२९५ झाली आहे. सध्या २,९५९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
या मुद्द्यांवर होईल बैठकीत चर्चा
– लॉकडाऊन आवश्यक आहे का?
– रुग्णसंख्या जास्त असलेल्या भागापुरते लॉकडाऊन, कंटेनमेंट झोन करावे का?
– कोणते उद्योग, व्यवसाय बंद ठेवावे लागतील?
– दहावी, बारावी वर्ग, कोचिंग क्लासेसचे काय?
– बससेवा, सिनेमागृह, मंगलकार्य, धार्मिक सोहळे, जिम, क्रीडा मैदानांचे काय?
उद्योजकांचा इशारा : लॉकडाऊन लावला तर अर्थव्यवस्था कोलमडेल
उद्योजकांनी संभाव्य लॉकडाऊनला कडाडून विरोध दर्शवला आहे. गेल्या काही महिन्यांत रुळावर येत असलेली अर्थव्यवस्था दहा दिवस सगळे बंद केल्याने कोलमडून पडेल. हातावर पोट असलेल्यांचे हाल होतील, असा इशारा त्यांनी दिला आहे. तर वैद्यकीय क्षेत्रातील ज्येष्ठ तज्ज्ञ डॉ. पी. वाय. मुळे म्हणाले की, गेल्या वर्षीच्या तुलनेत मृत्यूंचे प्रमाण कमी आहे. मोठ्या संख्येने रुग्ण बरे होत आहेत. त्यामुळे शेवटचा पर्याय म्हणून लॉकडाऊनचा विचार झाला पाहिजे.
प्रख्यात उद्योजक राम भोगले म्हणाले की, संख्या वाढली असली तरी परिस्थिती आटोक्याबाहेर जाईल असे दिसत नाही. डॉक्टरांना उपचार पद्धती माहिती झाली आहे. जे लोक दुर्लक्ष करत आहेत, अशांचाच मृत्यू होत आहे. त्यामुळे लॉकडाऊन कशासाठी? प्रशासनाने १४४ कलमाची कडक अंमलबजावणी केली तरी पुरेसे आहे. शेवटी या निर्णयाचा हातावर पोट असणाऱ्यांना किती फटका बसणार, याचा विचार झालाच पाहिजे. कारण गेल्या वर्षी सप्टेंबरनंतर अर्थव्यवस्था सुधारण्यास सुरुवात झाली. काही लोकांच्या हाताला काम मिळू लागले आहे. त्याला ब्रेक का लावता? येथील लोकप्रतिनिधींनीही एकत्रितपणे लॉकडाऊनला विरोध केला पाहिजे.
पुण्यात एक हजारपेक्षा अधिक रुग्ण आहेत. तेथे उपमुख्यमंत्री अजित पवार आढावा घेऊन निर्णय घेऊ, असे म्हणतात. इथे लॉकडाऊनची भाषा सुरू आहे. डॉ. मुळे म्हणाले की, पहिल्यांदा कोरोना आला तेव्हा डॉक्टरांना त्याबद्दल सखोल माहिती नव्हती. आता तशी स्थिती नाही. कोणती औषधी द्यायची, रुग्णांवर उपचाराची पद्धती कळली आहे. त्यामुळे पूर्ण लॉकडाऊनपेक्षा कंटेनमेंट झोन करावेत. रुग्णसंख्या जास्त असलेल्या वसाहती सीलबंद करता येतील.
पुण्यात औरंगाबादच्या चौपट रुग्ण : पुणे, पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीणमध्ये ३ मार्च रोजी १७१४, चार रोजी १८३१, पाच रोजी १८०३ रुग्ण आढळले. औरंगाबादच्या तुलनेत ही रुग्णसंख्या सुमारे चौपट आहे.