दैनिक स्थैर्य | दि. ४ ऑगस्ट २०२३ | फलटण |
सातारा जिल्हा नेहमीच सैनिकांचा जिल्हा म्हणून देशभर ओळखला जातो. देशाच्या सीमेवर कर्तव्य बजावताना यापैकी काही जवान दुर्दैवाने शहीद होतात. त्यांच्याप्रती छोटीशी कृतज्ञता म्हणून शासनातर्फे त्यांच्या वारसांना पात्रतेनुसार कसण्यासाठी शेतजमीन देण्यात येते. महसूल विभागामार्फत आयोजित दि. १ ऑगस्ट ते ७ ऑगस्ट २०२३ मधील महसूल सप्ताहांतर्गत दि. ५ ऑगस्ट हा दिवस ‘सैनिकहो तुमच्यासाठी’ म्हणून साजरा करण्याचे निश्चित केले आहे.
या दिवशी सातारा जिल्ह्यातील शहीद जवान यांच्या वीरपत्नी श्रीमती विजया माणिकराव देशमुख (रा. भवानीनगर (राजुरी), ता. फलटण, जि. सातारा), श्रीमती वैशाली रवींद्र धनावडे (रा. मोहाट, ता. जावली, जि. सातारा), श्रीमती पुष्पलता काशिनाथ मोरे (रा. आदित्यनगरी, सातारा, ता.जि. सातारा), श्रीमती मंदाकिनी सुनील कचरे (रा. सालपे, ता. फलटण, जि. सातारा) यांना सातारा जिल्हाधिकारी यांनी सासवड (ता. फलटण) येथील गट नं. ७७६ पै. क्षेत्र ९ हे. ८१ आर मधील प्रत्येकी २.०० हे.आर कसण्यासाठी जमीन मंजूर केली आहे.
या जमिनींचे वाटप आदेश दि. ५ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी ११.०० वाजता फलटण तहसील कार्यालय येथे वीरपत्नी यांना प्रदान करण्यात येणार आहेत.
या कार्यक्रमास तालुक्यातील नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन फलटण तहसील कार्यालयातर्फे करण्यात आले आहे.