स्थैर्य, सातारा,दि. 10 : करोना साथ नियंत्रणाच्या अनुषंगाने तसेच दोन तीन दिवसांपूर्वी सातारा तालुका पोलीस ठाण्यातच घडलेल्या खुनाच्या घटनेने कायदा व सुव्यवस्थेचा फेरआढावा घेण्याची गरज निर्माण झालेली आहे. याप्रकरणी अंतर्गंत सुरक्षा नियमांविषयी बेपर्वायी व कर्तव्य कसूर प्रकरणी तालुका पोलीस ठाण्याच्या अधिकाऱयांची चौकशी करावी तसेच शहरातील कायदा व सुव्यवस्थेचे ऑडिट करावे, अशी मागणी सातारा शहर सुधार समितीने जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याकडे केली आहे.
यासंदर्भात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सातारा तालुका पोलीस ठाण्यात दोन तक्रारदारांनी एकमेकांवर हल्ला केला. यात एकजण मृत्यूमुखी पडला आहे. ही बाब शहरातील कायदा व सुव्यवस्थेला आव्हान देणारी आहे. त्यामुळे सातारा शहर व तालुका पोलीस ठाण्याच्या कामकाजाचे ऑडिट करुन कर्तव्यतत्पर पोलीस ठाणी प्रस्थापित करावीत तसेच तालुका पोलीस ठाण्याचे स्थंलातर महानुभव मठासमोर सातारा आकाशवाणी केंद्र परिसरात करुन तालुका पोलीस ठाण्याच्या ठिकाणी शहर वाहतूक शाखेचे स्थंलातर करावे.
याबरोबरच करोना साथ नियंत्रणासाठी गंभीर होणे आवश्यक असून यासाठी सातारा पालिका आस्थापनेवर तातडीने सक्षम वैद्यकीय अधिकारी, आरोग्य अधिकारी, पब्लिक हेल्थ अँड सॅनिटेशन इंजिनिअर, सुपरव्हायझर, इन्स्पेक्टर यांची पूर्णवेळ नेमणूक करा, कोरोनासंदर्भातील सर्व प्रकारच्या आरोग्य, उपचार व स्वास्थ विषयक सर्व्हेक्षणचा माहिती अहवाल जाहीर करावा, शहर परिसरातील ड्रेनेज, सॅनिटेशन, कचरा, घनकचरा सॉलिडवेस्ट ट्रीटमेंटविषयी वस्तुनिष्ठ अहवाल जाहीर करावा तसेच शहर परिसराचा प्रदुषण अहवाल प्रसिध्द करुन शहरात सीएनजी पंप, सायकल ट्रक विकसित करण्याची मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर शहर सुधार समिती व विकास समितीच्या विक्रांत पवार, प्रकाश खटावकर, विजय निकम, शंकर पाटील, असलम तडसरकर, ऍड. नंदकुमार मोहिते, शिवाजी राऊत यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.