
स्थैर्य, औरंगाबाद, दि.६: मराठवाडा व गिरणा उपखोऱ्यासाठी कोकणातील नद्यांचे १६८ टीएमसी पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्याच्या योजनेला मंजुरी मिळाली आहे. मात्र, याचे मुख्य अभियंता कार्यालय नाशकातून औरंगाबादेत आणण्यासाठी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिल्यावर मुख्यमंत्र्यांनी प्रस्ताव पाठवा, मी बघतो, असे उत्तर दिले.
दमणगंगा पिंजाळ, नार-पार, गिरणा, गोदावरी, दमणगंगा, वैतरणा, गोदावरी नदीजोड प्रकल्प राबवण्याचे ठरले आहे. अंमलबजावणीसाठी स्वतंत्र मुख्य अभियंता कार्यालय, मुख्य अभियंतापदाची निर्मिती १९ सप्टेंबर २०१९ च्या जीआरनुसार होऊन नाशिकला ११ डिसेंबर २०२०ला कार्यालय सुरू झाले. यासंदर्भात केंद्रेकरांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले की, हे कार्यालय औरंगाबादेत असेल तर ते मराठवाड्यासाठी उपयुक्त ठरेल.