दैनिक स्थैर्य । दि. २६ नोव्हेंबर २०२१ । सातारा । मृत मुलाच्या मृत्यूनंतर त्याच्या पश्चात पत्नी व मुलगा असतानाही त्याला कोणी वारस नसल्याचे खोटे प्रतिज्ञापत्र तयार करून संपत्ती हडप करण्याचा प्रयत्न केल्याने इंदुमती रामदास चव्हाण, रामदास बाजीराव चव्हाण (दोघे रा. एकंबे,ता.कोरेगाव) यांच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी वैशाली रविंद्र चव्हाण यांनी तक्रार दिली आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांचे पती रविंद्र यांचे काही दिवसापूर्वी निधन झाले आहे. त्यांची मुळ गाव एकंबे येथे शेतजमिन असून सातारा शहरात एक रो हाऊस आहे. ते हडप करण्याच्या हेतून संशयितांनी मृत मुलगा रविंद्र याच्या पश्चात त्याला पत्नी अथवा मुले असे कोणीही वारस नसून आम्हीच त्याचे वारस असल्याचे खोटे प्रतिज्ञापत्र कोरेगाव व सातारा येथील तहसील कार्यालयात तयार करून घेतले. त्या खोट्या प्रतिज्ञापत्राच्या आधारे एकंबे ता.कोरेगाव व सातारा येथील रो हाऊस प्रमोदकुमार हणमंत चव्हाण यांना विकले. तसेच विक्री दस्ताची नोंद करण्यासाठी गावकामगार तलाठ्यांना तक्रारदारांचे सासरे रामदास यांनी खोटे नोटरी प्रतिज्ञापत्र सादर करून त्यांना फसवले. तसेच मृत रविंद्र यांना पत्नी वैशाली व मुलगा कौस्तुभ हे वारस असताना ही त्यांची सपंत्ती हडप करण्याच्या हेतूने त्यांची फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पुढील तपास हवालदार गायकवाड हे करत आहेत.