दैनिक स्थैर्य । दि. १६ मे २०२२ । सांगली । अहिंसा परमोधर्म, जगा आणि जगू द्या, या तत्वांचे आचरण करुन संस्कृतीशी एकरुप झालेला जैन समाज आहे. सामाजिक भान जपणाऱ्या जैन समाजाच्या मागण्या, प्रलंबित प्रश्न प्राधान्याने सोडविले जातील. विकासाच्या वाटेवर घेऊन जाण्यासाठी जैन समाजाला जे-जे देता येईल ते-ते देण्याचा प्रयत्न केला जाईल, यासाठी राज्य शासन यत्किंचितही कमी पडणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सांगली येथे दक्षिण भारत जैन सभेच्या महाअधिवेशनात बोलताना दिली.
दक्षिण भारत जैन सभेचे १०० वे महाअधिवेशन (त्रैवार्षिक) नेमिनाथ नगर सांगली येथे संपन्न झाले. या अधिवेशनात प्रमुख पाहुणे म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. कार्यक्रमास सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, गृहराज्य मंत्री सतेज पाटील, सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, सहकार व कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम, खासदार संजय पाटील, आमदार अरुण लाड, आमदार प्रकाश आवाडे, आमदार सुमनताई पाटील, आमदार सुरेश खाडे, आमदार अभय पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार अनिल बाबर, महापौर दिग्विजय सूर्यवंशी, माजी मंत्री कल्लापाआण्णा आवाडे, दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष रावसाहेब पाटील यांच्यासह मान्यवर पदाधिकारी, महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातून आलेले श्रावक-श्राविका मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, जैन समाजाने आपल्या आचार आणि विचारातून अहिंसेच्या तत्वातून प्रेमाचा संदेश दिला आहे. सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या जैन समाजाने दातृत्वातून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. समाजाचे असणारे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी पावसाळी अधिवेशनापूर्वी सर्व संबंधितांची मुंबई येथे बैठक घेऊन समाजाचे प्रश्न समाजवून घेऊन ते मार्गी लावले जातील.
उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, जात-पात, धर्म या यापेक्षा माणुसकीचा विचार मोठा आहे. मानवधर्माचा विसर कोणालाही पडू नये यासाठी जैन धर्माचे विचार आणि आचार आचरणात आणणे गरजचे आहे. जैन समाजाचे या विचारानेच कार्य होत असल्याचे उपमुख्यमंत्री म्हणाले. सर्वांचे हित साधून प्रत्येक संकट काळात मदतीसाठी पुढे येणाऱ्या या समाजाला शासनही सर्वतोपरी सहकार्य करील. जैन समाजाच्या विकासासाठी अन्य राज्यात राबविण्यात येत असलेल्या योजनाही महाराष्ट्र राज्यात राबवून या योजनांचा लाभ जैन समाजाला मिळवून दिला जाईल असा विश्वास उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी यावेळी व्यक्त केला.
समाजातील बहुतांशी वर्ग हा शेतकरी आहे. जमिनीचे प्रमाण कमी होत असल्याने तो अल्पभूधारक बनला आहे. राज्य शासनाने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कर्जमाफी योजना केली. नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना यंदा अर्थसंकल्पात तरतूद केली आहे. सहकार विभागाकडून याची यादी प्राप्त होताच संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा करण्यात येणार आहे. याबरोबरच 2 लाखावरील कर्जाबाबतही शासन विचार करीत असल्याचे उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी सांगितले.
दक्षिण भारत जैन सभा समाजाच्या न्याय्य हक्काचा लढा संविधानिक मार्गाने पुढे घेऊन जाण्याची भूमिका बजावेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. दक्षिण भारत जैन सभेने घेतलेले उपक्रम स्तुत्य असून चांगले काम करणाऱ्यांचा सत्कार केल्याबद्दल उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी संयोजकांना धन्यवाद दिले.
जैन समाजाचे आचार-विचार, त्यांची परोपकार भावना, मानवता, उद्यमशीलता, शिक्षण तसेच निरोगी आरोग्याची सवय इतर समाजानेही अंगीकृत करावी, असे आवाहनही उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी केले.
ग्रामविकासमंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, भगवान महावीरांच्या तत्वांनुसार जैन समाजातील प्रत्येक घटक काम करुन संस्कार, शिक्षण, आरोग्य या त्रिसुत्रीचे आपल्या जीवनात आचरण करीत आहे. कष्ट करणारा हा समाज असून समाजात बहुतेक वर्ग हा शेतकरी आहे. समाजाच्या प्रलंबित मागण्या व समस्या सोडविण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा केला जाईल, असेही श्री. मुश्रीफ म्हणाले.
पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, शांततेची सुरुवात जैन धर्मियांच्या विचारातून झालेली असून त्या तत्वानुसार जगणारा हा समाज आहे, त्यांचे अनुकरण सर्वांनी करावे. समाजातील बहुतांश लोक हे शेतीमधून उपजीविका करतात. शेती कमी झाली असल्याने समाजाने शिक्षणाची कास घरुन उद्योग, व्यवसायात पुढे येणे गरजेचे आहे. जैन समाजातील अनेक मान्यवरांनी समाजाला दिशा देण्याचे चांगले काम केले आहे. त्यांचे काम युवकांना प्रेरणादायी असल्याचेही श्री. पाटील म्हणाले.
बाहुबली हे सर्वांचे श्रद्धास्थान असून या ठिकाणी आवश्यक सेवा सुविध उपलब्ध करुन देण्यास प्राधान्य दिले जाईल. तसेच समडोळी येथे शांतीसागर महाराजांचे जन्मशताब्दी वर्ष चांगल्या उपक्रमांनी साजरे केले जाईल. जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून जैन समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण आग्रही राहू. तसेच जैन समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार मदत करतील अशी ग्वाही त्यांनी दिली.यंदाच्या पावसाळ्यात संभाव्य पूर परिस्थिती उद्भवू नये यासाठी जलसंपदा विभागामार्फत धरणात कमीत कमी पाणी ठेवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचेही त्यांनी सांगितले.
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री. सामंत म्हणाले, सत्य व अहिंसा या तत्वावर चालणाऱ्या जैन समाजाच्या मागण्या मान्य करणे ही शासनाची जबाबदारी असून शासन यामध्ये मागे पडणार नाही. जैन समाजासाठी जे-जे करता येईल ते प्राधान्याने केले जाईल. शिवाजी विद्यापीठातील भगवान महावीर अध्यासनासाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन दिला जाईल. यावर्षी या अध्यासनासाठी 3 कोटी रुपये उपलब्ध करुन दिले जातील, असे त्यांनी यावेळी सांगितले. शांतीसागर महाराजांचे विचार सर्वदूर पोहचावेत. भावी पिढीला त्यांच्या विचारांचे मार्गदर्शन व्हावे यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभागामार्फत त्यांचे पुस्तक प्रकाशित केले जाईल. राज्यातील सर्व ग्रंथालयामध्ये हे पुस्तक उपलब्ध होईल असेही उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. सामंत म्हणाले.
गृहराज्यमंत्री सतेज पाटील म्हणाले, जैन समाज शांतता प्रिय समाज असून तत्वाने काम करणारा आहे. दातृत्व हा या समजाचा विशेष गुण असून असून अडचणीच्या काळात सर्वांना मदत करण्यासाठी समाज नेहमीच पुढे असतो. वीर सेवा दलाच्या माध्यमातून अनेक समाजपयोगी उपक्रम राबविले जात असून विकास कामामध्ये जैन समाजाचे महत्वपूर्ण योगदान आहे. समाजाच्या समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेतला जाईल. शिवाजी विद्यापीठातील भगवान महावीर अध्यासनाच्या कामास गती दिली जाईल, अशी ग्वाही श्री. पाटील यांनी यावेळी दिली.
आरोग्य राज्यमंत्री तथा महाअधिवेशनाचे स्वागताध्यक्ष राजेंद्र पाटील-यड्रावकर म्हणाले, १२३ वर्षपूर्वी दक्षिण भारत जैन सभेची स्थापना झाली. क्रांतीकारकांच्या सांगली जिल्ह्यात दक्षिण भारत जैन सभेचे 100 वे महाधिवेशन होत आहे ही समाजासाठी अभिमानाची गोष्ट आहे. अहिंसेचा पुरस्कार करून जगा आणि जगू द्या..या तत्त्वानुसार आचरण करणारा जैन समाज आहे. नवीन कल्पनांचा स्वीकार समाज नेहमीच करत आहे. भविष्यात शिक्षण, उद्योग, व्यवसाय यामध्ये तरुणांना वाव मिळावा यासाठी शासनाने धोरणात्मक निर्णय घ्यावा आणि जैन समाजाच्या समस्या व अडचणी सोडवण्यासाठी शासनाने मदत करावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
सहकार राज्यमंत्री डॉ. कदम म्हणाले, जैन समाज हा मातीशी नाळ जोडलेला समाज आहे. शेती बरोबरच व्यापार, उद्योग, व्यावसायात या समाजाने आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे. राज्य, देशाच्या जडणघडीमध्ये समाजाचे फार मोठे योगदान आहे. सर्व धर्म समभाव ही संस्कृती समाजाने आपल्या आचार, विचारातून जपली असून प्रवचनातून समाज प्रबोधनाचे उत्तम रितीने चालले आहे. अल्पसंख्याक विभागामार्फत समाजाच्या उन्नतीसाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील अशी ग्वाही डॉ. कदम यांनी यावेळी दिली.
दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष रावसाहेब पाटील म्हणाले १२३ वर्षपूर्वी जैन सभेची स्थापना झाली आहे असे सांगून, जैन समाज दातृत्वाला महत्त्व देणारा समाज आहे. संकटाच्या काळात मदत नेहमीच मदतीसाठी पुढे येतो. कर्तृत्त्व, नेतृत्व करण्याचे गुण समाजात आहेत. शिक्षणात समाज सर्वात पुढे आहे. मात्र शेती कमी झाली आहे त्यामुळे काही आर्थिक समस्यांचा सामना करावा लागतो आहे. यासाठी अल्पसंख्याक योजनांचा लाभ समाजाला मिळावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमात माजी खासदार प्रकाश हुक्केरी, माजी खासदार राजू शेट्टी, कर्नाटकचे आमदार अभय पाटील, माजी महापौर सुरेश पाटील, रावसाहेब पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले.
दक्षिण भारत जैन सभेच्यावतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते माजी मंत्री कलाप्पाण्णा आवाडे यांना शिक्षण सेवक पुरस्कार तर स्व. बापुसाहेब बोरगावे यांना जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला.