वाढे फाट्यानजिक अट्टल चोरटे गजाआड 


स्थैर्य, सातारा, दि.१४: सातारा, सोलापूर आणि पुणे जिल्ह्यात लुटमारी आणि दुचाकी चोरी करणार्‍या दोन सराईत चोरट्यांना सातारा तालुक्याच्या डी. बी. पथकाने महामार्गावरील वाढे फाटा परिसरात पाठलाग करून जेरबंद केले. त्यांच्याकडून सहा गुन्हे उघड झाले असून पोलिसांनी पाच दुचाकी आणि दोन मोबाईल असा 94 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. 

याबाबत माहिती अशी, सातारा तालुका पोलिस ठाण्याचे डी. बी. पथक वाढे फाटा, ता. सातारा येथे सातारा तालुका पोलिस ठाण्याचे डी. बी. पथक पेट्रोलिंग करत होते. यावेळी सर्व्हिसरोड लगत दोन इसम मोटरसायकलवरून संशयितरित्या फिरत असताना आढळून आले. पोलिसांनी त्यांच्यावर बारकाईने लक्ष ठेवून त्यांना ताब्यात घेण्यास गेले. पोलिस येत असल्याचे पाहताच ते मोटारसायकल जागीच टाकून पळून जावू लागले. डी. बी. पथकाने शिताफीने पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने त्यांच्यावरील संशय अधिक बळावला. मग पोलिसांनी कसून चौकशी केली असता त्यांनी हिरो होन्डा स्प्लेंडर मोटारसायकल सातारा शहर पोलीस ठाणे हद्दीतील कणसे हुन्डाई शोरूम जवळून चोरी केल्याचे सांगितले. त्याबाबत सातारा शहर पोलीस ठाणेस या गुन्हयाबाबत खात्री केली असता सदरचा गुन्हा घडलेची माहिती प्राप्त झाली. सदर संशयितांनी अशाच प्रकारचे इतरही गुन्हे केले असल्याची माहिती गोपनिय बातमीदाराकडून प्राप्त झाल्याने संशयितांना पोलीस खाक्या दाखवला. यानंतर मात्र त्यांनी सातारा शहरात मोटारसायकल चोरी, नातेपुते, ता. सोलापूर येथे दरोड्यात सहभाग, दोन दुचाकी चोरी, वालचंदनगर पुणे जबरी चोरी करून दोन मोबाईल चोरी, वारजे पुणे मोटारसायकल चोरी असे गुन्हे केल्याची कबुली दिली. आरोपींनी चोरलेल्या दुचाकींचे चेसी, इंजीन नंबर ग्राइंडरने नष्ट केल्याचे निष्पन्न झाले आहे. 

याबाबतचे गुन्हे याठिकाणच्या पोलिस ठाण्यांमध्ये दाखल झाले आहेत. यापूर्वी देखील त्यांच्यावर सातारा, सोलापूर पुणे जिल्हयांमध्ये जबरी चोरी, बलात्कार, दरोड्याचे गुन्हे दाखल आहेत. तसेच अशाच प्रकारे त्यांनी गुन्हे केल्याबाबत माहिती प्राप्त झाली आहे. संबंधित पोलीस ठाण्यांत याबाबत माहिती सादर करण्यात आलेली आहे. गुन्हेगार अत्यंत सराईत असून त्यांना ताब्यात घेवून त्यांचेकडून वरील गुन्हे अत्यंत कसोशीने विचारपूस करून उघड करून गुन्हयातील एकूण 5 मोटारसायकली, दोन मोबाईल, ग्राईंडर असा एकूण 94 हजार 590 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून एकूण 6 गुन्हे उघड करण्यात आलेले आहेत. 

या कामगिरीबद्दल जिल्हा पोलीस अधिक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधिक्षक धीरज पाटील, सहाय्यक पोलीस अधिक्षक आँचल दलाल यांच्या मार्गदर्शनखाली पोलीस निरीक्षक सजन हंकारे, उपनिरीक्षक अमित पाटील, डी. बी. पथकातील हवालदार दादा परिहार, पो. ना. सुजीत भोसले, पो. ना. हेमंत ननावरे, पो. कॉ. सागर निकम, पो. कॉ. सतीश पवार, पो.कॉ. नितीराज थोरात यांनी केलेली आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!