कोरोना बाधिताला आणायला गेलेल्या वैद्यकीय पथकावर हल्ला

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, महाबळेश्‍वर, दि. 31 : रांजणवाडी येथील कोरोना रुग्णांना उपचारासाठी घेवून जाण्यासाठी आलेल्या वैद्यकीय पथकावर रुग्णांच्या नातेवाईक व जमावाने दगडफेक करून हल्ला केला. या हल्ल्यात एका वाहनाचे नुकसान झाले तर घटनास्थळावरून पळ काढल्यामुळे पालिकेचे अधिकारी, डॉक्टर व कर्मचार्‍यांचे जीव वाचले. या प्रकरणी पालिकेच्या तक्रारीवरून पोलिसांनी एका महिलेसह चार जणांवर तसेच 100 ते 125 अज्ञात इसमांवर गुन्हा दाखल केला आहे. शहरात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला असून गावात तणावपूर्ण शांतता आहे.

शहरापासून दोन कि.मी. अंतरावर रांजणवाडी वसाहत आहे. या ठिकाणी सर्वात प्रथम एका लहान मुलाला कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर त्याच  वसाहतीमधील दोन पालिका कर्मचार्‍यांना कोरोना झाला. त्यानंतर एका गरोदर महिलेला कोरोनाची बाधा झाली. रांजणवाडी भागात कोरोनाची रुग्णसंख्या वाढू लागल्याने उपविभागीय अधिकारी संगीता राजापुरे यांनी रांजणवाडी हा भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केला. पालिकेने या आदेशाची कडक अंमलबजावणी सुरू करून हा भाग सिल केला. या भागात प्रवेश करणे व बाहेर पडणे प्रतिबंधित करण्यात आले. यावरून रांजणवाडीमधील लोकांमध्ये तीव्र नाराजी पसरली होती.

अशातच रांजणवाडी भागातील रहिवाशांच्या सोयीसाठी गुरुवारी पालिका व ग्रामीण रुग्णालयाच्यावतीने रॅपिड अँटिजेन टेस्ट करण्यासाठी खास शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात एकूण 86 जणांची टेस्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला. पैकी 46 जणांची टेस्ट घेण्यात आली. यामधील एका गरोदर महिलेसह सात जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. दोन गरोदर महिलांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उरलेल्या कोरोना रुग्णांना घेवून जाण्यासाठी पलिकेचे अधिकारी, डॉक्टर व त्यांचे सहकारी रांजणवाडी येथे वाहनांचा ताफा घेवून पोहोचले असता या रुग्णांना बरोबर घेवून जाण्यास येथील लोकांनी विरोध केला. पथकाबरोबर स्थानिक लोकांची बाचाबाची सुरू असताना तेथे मोठा जमाव जमला. परिस्थिती तणावपूर्ण झाली. आम्हाला सर्वांना बरोबर घेवून जा. आमच्यावर येथेच उपचार करा. आम्ही रुग्णालयात येणार नाही. संपूर्ण गावच क्वारन्टाइन करा, अशा मागण्या रांजणवाडी येथील रहिवाशांनी केल्या. काही उत्साही तरुणांनी घोषणाबाजी सुरू केल्याने तणाव वाढला. जमाव पथकातील अधिकार्‍यांच्या अंगावर येवू लागल्याने परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे दिसताच पालिकेच्या मुख्याधिकारी पल्लवी भोरे-पाटील यांनी आपल्या कर्मचार्‍यांना घेवून परत फिरण्याचा निर्णय घेतला. पथक परत फिरताना जमावाने मागून दगडफेक सुरू केली. दगडफेक सुरू होताच एकच धावपळ सुरू झाली. एका वाहनात मुख्याधिकारी, डॉक्टर व काही कर्मचारी पटापट बसले व त्यांनी तेथून पळ काढला. या धावपळीत पालिकेचे अभियंता सस्ते यांचे वाहन तेथेच राहिले. हे वाहन जमावाने लक्ष्य केले. जमावाने वाहनाची तोडफोड केली. अनेक कर्मचार्‍यांनी जंगलात धूम ठोकली व आपला जीव वाचविला. रांजणवाडी येथील परिस्थितीची माहिती मुख्याधिकारी भोरे-पाटील यांना पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच वाईचे उपविभागीय पोलीस अधिकारी पोलिसांची कुमक घेवून घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. त्यानंतर उपनगराध्यक्ष अफजल सुतार, नगरसेवक नासिर मुलाणी, युसूफ शेख, तौफिक पटवेकर आदींच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीनंतर तणाव निवळला व रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

पालिका अधिकारी व कर्मचार्‍यांवर हल्ला झाल्याने या संदर्भात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. पालिकेच्या तक्रारीवरून पोलिसांनी रात्री उशिरा नाजनिन रौफ डांगे, नईम मुजावर, वाहीद उस्मान मुजावर, अझर बढाणे व इतर 100 ते 125 पुरुष व महिलांवर गुन्हा दाखल केला आहे.

काम बंद आंदोलन मागे

पालिकेच्या पथकावर रांजणवाडी येथे जमावाने हल्ला केल्यामुळे पालिकेच्या कर्मचार्‍यांनी शुक्रवारी काम बंद आंदोलन सुरू केले. हल्लेखोरांवर तातडीने कडक कारवाई करण्याच्या मागणी बरोबरच अशा घटना पुन्हा घडू नयेत आणि घडल्यास कर्मचार्‍यांना संरक्षण मिळावे, अशा मागण्या कर्मचार्‍यांनी मुख्याधिकारी पल्लवी भोरे-पाटील यांच्याकडे निवेदन देवून केल्या. मुख्याधिकारी व नगरसेवक कुमार शिंदे यांनी कर्मचार्‍यांबरोबर चर्चा केली व त्यांना ठोस आश्‍वासन दिल्यानंतर कर्मचार्‍यांनी काम बंद आंदोलन मागे घेतले.

नागरिकांनी सहकार्य करावे

अशाप्रकारे हल्ला करून काहीही साध्य होणार नाही. पालिका प्रशासन व वैद्यकीय पथक गेले तीन महिने नागरिकांच्या सुरक्षेसाठीच झटत आहे. अशा स्थितीत नागरिकांनी प्रशासनास सहकार्य केले पाहिजे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाला नागरिकांच्या सहकार्याची गरज आहे. तुमच्या सहकार्याशिवाय काहीही होणार नाही. प्रशासन तुमच्यासाठीच आहे, – मुख्याधिकारी पल्लवी भोरे-पाटील


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!