स्थैर्य, दि.११: भाजप नेते विनोद तावडे यांनी मोठा दावा केला आहे. विधानसभा निवडणुकीत तिकिट मिळाले नाही तेव्हा उद्धव ठाकरे, अजित पवार, राज ठाकरे अशा अनेक नेत्यांनी फोन केल्याची माहिती तावडे यांनी दिली. भाजपच्या राष्ट्रीय सचिवपदी निवड झाल्याबद्दल बोरिवली येथे सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी ते बोलत होते.
यावेळी विनोद तावडे म्हणाले की, ‘निवडणुकीत तिकीट मिळाले नाही तेव्हा उद्धव ठाकरे, अजित पवार, राज ठाकरे अशा अनेक नेत्यांनी फोन करुन विचारपूस केली. पण, भाजप सोडा आणि आमच्याकडे या असे म्हणायची कुणीही हिंमत केली नाही. त्यांना माहीत आहे की मी पक्का संघवाला आहे. पक्षाने आपल्यासाठी चांगला निर्णय घेतला, तर आपल्याला बरं वाटतं आणि जर काही वेगळा निर्णय घेतला तर मग वाईट वाटून घेऊ नये. पक्षाने काही विचार केलेला असतो’, असे मत तावडे यांनी यावेळी व्यक्त केले.