
दैनिक स्थैर्य । दि. १५ जुलै २०२१ । सातारा । माजगाव, ता. सातारा गावच्या कमानीजवळ तीन चोरट्यांनी फायनान्स कंपनीच्या वसुली कर्मचार्यास अडवून काठीने मारहाण करून त्याच्याजवळील सुमारे 46 हजारांची रक्कम आणि सॅमसंग कंपनीचा टॅब जबरदस्तीने चोरून नेला.
याबाबत गणेश वैजनाथ राख यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, ते दि. 13 रोजी सकाळी 7 च्या सुमारास नेहमीप्रमाणे कर्जाचे हफ्ते गोळा करण्यासाठी दुचाकीवरून निघाले होते. प्रथम अंधारवाडी, ता. कराड गावामध्ये जावून त्यांनी वसुलीला सुरूवात केली. यानंतर खराडे ता. कराड, माजगाव ता. सातारा या गावांमध्ये जावून गोळा केलेली रक्कम आणि व सॅमसंग कंपनीचा टॅब एका काळ्या बॅगेत ठेवला. रक्कम भरण्याकरिता ते उंब्रजला दुचाकीवरून निघाले. दुपारी 12च्या सुमारास माजगाव कमानीच्या अलीकडे रस्त्यामध्ये तीन अज्ञात इसम वय अंदाजे 20 ते 25 यांनी माझी गाडी रस्त्यामध्ये जबरदस्तीने थांबवून मला हाताने मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यांच्यापैकी काळा टीशर्ट घातलेल्या एकाने हातातील बॅग हिसकावून तिघेजण उसाचे शेतातून पळून गेले.
याप्रकरणी गणेश राख यांनी बोरगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर तीन अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.