स्थैर्य, कोरेगाव, दि.७: कोरेगाव आणि पुसेगावमध्ये गुरुवारी गुटखा अवैद्य वाहतूक आणि साठा प्रकरणी झालेल्या पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. कोरेगावातील गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीला जामीन मिळवून देण्यासाठी मदत करण्यासाठी २० हजारांची लाच त्याच्याच सख्या भावाकडून स्वीकारताना सातारच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. सहाय्यक फौजदार प्रल्हाद श्रीरंग पाटोळे याला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, की कोरेगाव पोलीस ठाण्यात गेल्या पाच वषार्र्पासून सहाय्यक फौजदार प्रल्हाद पाटोळे हा कार्यरत असून, त्याच्याकडे गुन्हे प्रकटीकरण अर्थात डी. बी. विभागाचा पदभार आहे. त्याचबरोबर फरारी आरोपी शोधणे, न्यायालयाने बजावलेल्या वॉरंटमधील आरोपींना पकडणे आदीची जबाबदारी देखील त्याच्यावर देण्यात आलेली आहे. कोरेगाव पोलीस ठाण्यातून सहा पोलीस निरीक्षक, दोन परिविक्षाधीन पोलीस अधीक्षक व परिविक्षाधीन उपअधीक्षक बदलून गेले, मात्र पाटोळे याच्यावर देण्यात आलेली जबाबदारी ही कायम होती.
पाटोळे याच्या पथकामध्ये अन्य कर्मचार्यांबरोबरच फलटण येथून डिफॉल्ट ट्रान्सफरवर आलेला कर्मचारी साहिल झारी हा कायम कामगिरीवर असायचा. पाटोळे व झारी यांच्या जोडीने गेल्या पाच ते सहा महिन्यात अनेक कारवाया केल्या होत्या, या दोघांचा वावर भल्याभल्यांना धडकी भरवत असे. त्यामुळे काही दिवसांपूर्वी झारी याला उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात फरारी आरोपी शोध मोहिमेसाठी नेमण्यात आले होते.
गुरुवारी रात्री पुसेगावमधून कोरेगाव शहरात अवैद्यरित्या गुटख्याची वाहतूक होणार असल्याची खात्रीलायक बातमी साहिल झारी या पोलीस कर्मचार्याला मिळाली होती, त्याने ही बाब उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे यांना सांगितली. त्यांच्या सूचनेनुसार उपनिरीक्षक विशाल कदम, सहाय्यक फौजदार प्रल्हाद पाटोळे व साहिल झारी यांनी कुमठे फाटा येथे कारवाई करत एका मोटारसायकलस्वाराकडून ९४ हजार रुपयांचा गुटखा जप्त केला होता. कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन संशयित युवकाला अटक करण्यात आली होती. पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे या गुन्ह्याचा तपास करत होते.
गुटखा वाहतुकीच्या गुन्ह्यात अटक केलेल्या संशयित आरोपीला जामीन मिळवून देण्यासाठी सहकार्य करण्याच्या मोबदल्यात २० हजार रुपयांची लाच सहाय्यक फौजदार प्रल्हाद पाटोळे याने त्याच्या भावाकडे मागितली होती. भावाने विनाविलंब सातारा येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस निरीक्षक आरिफा मुल्ला यांच्याकडे संपर्क साधून तक्रार नोंदविली होती. या तक्रारीची पडताळणी केल्यानंतर शनिवारी सकाळी कोरेगाव पोलीस ठाण्यासमोर असलेल्या एका उपहारगृहाच्या परिसरात पाटोळे याला २० हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यावेळी अन्य एक पोलीस कर्मचार्याला ताब्यात घेण्यात आले होते. दोघांना तातडीने चौकशीसाठी नेण्यात आले, मात्र त्यातून एका कर्मचार्याला वगळण्यात आले. याबाबत माहिती घेतली असता, या कर्मचार्याचा सहभाग निश्चित होत नसल्याचे सांगण्यात आले, मात्र त्याला काही विशिष्ठ कारण असल्याची चर्चा कोरेगाव पोलीस ठाणे परिसरात दिवसभर सुरु होती.
पुणे विभागाचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, अपर अधीक्षक सुहास नाडगौडा, उपअधीक्षक अशोक शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक आरिफा मुल्ला, प्रशांत ताटे, विनोद राजे, विशाल खरात यांनी ही कारवाई केली. याप्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.