पिंप्रदमध्ये सरकारी मोजणीवेळी धरणग्रस्त वृद्ध महिलेला बेदम मारहाण! ‘तुला जमिनीत पाय टाकू देणार नाही’ म्हणत जमिनीच्या वादातून हल्ला


पिंप्रद (ता. फलटण) येथे जमिनीच्या सरकारी मोजणीदरम्यान एका ६५ वर्षीय धरणग्रस्त वृद्ध महिलेला शिवीगाळ करत बेदम मारहाण केल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. या मारहाणीत महिला आजारी पडल्याने त्यांना निकोप हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून, एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्थैर्य, फलटण, दि. ७ मार्च : पिंप्रद (ता. फलटण) गावच्या हद्दीत धरणग्रस्त म्हणून मिळालेल्या जमिनीची सरकारी मोजणी सुरू असताना, एका ६५ वर्षीय वृद्ध महिलेला ‘तुला मी या जमिनीत पाय टाकू देणार नाही,’ अशी धमकी देत धक्काबुक्की व मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या मारहाणीमुळे वृद्धेची प्रकृती बिघडल्याने त्यांना फलटण येथील निकोप हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून, याप्रकरणी एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी पारुबाई दगडू कंक (वय ६५ वर्षे, रा. जांभळी, ता. वाई, जि. सातारा, मूळ रा. कुडळी बु., ता. भोर) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पारुबाई कंक या धरणग्रस्त (प्रकल्पग्रस्त) असल्याने शासनाकडून त्यांना पिंप्रद (ता. फलटण) येथे गट क्र. ९७९ मध्ये ३३ गुंठे जमीन मिळाली आहे.

दिनांक २५ फेब्रुवारी २०२६ रोजी या जमिनीची सरकारी मोजणी असल्याने पारुबाई त्यांच्या पुतण्यासोबत (भरत कंक) पिंप्रद येथे आल्या होत्या. मोजणी सुरू झाल्यानंतर मूळ मालक मानसिंग गवारे यांनी पारुबाई यांना त्यांच्या जमिनीचा हिस्सा दाखवला.

‘तुझी धरणात जमीन गेली, इथे कशाला आलीस?’

हिस्सा दाखवल्यानंतर तिथे उपस्थित असलेल्या उदयसिंह निवृत्ती घनवट (रा. पिंप्रद, ता. फलटण) याने त्याला कडाडून विरोध केला. त्याने पारुबाई यांना उद्देशून, “तुझी धरणात जमीन गेली आहे, तू इथे कशाला जमीन घ्यायला आली आहेस, तुला मी या जमिनीत पाय टाकू देणार नाही,” असे म्हणत अत्यंत खालच्या भाषेत शिवीगाळ व दमदाटी करण्यास सुरुवात केली.

उजवा हात पिरगळला अन् खाली ढकलले

शिवीगाळ करण्यावरच न थांबता, उदयसिंह घनवट याने या ६५ वर्षीय वृद्धेला हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच त्यांचा उजवा हात जोरात हिसकावून त्यांना जमिनीवर ढकलून दिले. खाली पडल्याने आणि या अनपेक्षित हल्ल्यामुळे पारुबाई यांना अस्वस्थ वाटू लागले आणि भरपूर घाम येऊ लागला. त्यांनी तिथेच बसून बीपीची (रक्तदाबाची) गोळी खाल्ली.

निकोप हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू

त्या रात्री प्रकृती अधिकच बिघडल्याने पारुबाई यांनी सचिन धुमाळ यांच्याकडे मुक्काम केला. मात्र, रात्रभर चक्कर येणे आणि अस्वस्थ वाटणे सुरूच राहिल्याने दुसऱ्या दिवशी सचिन धुमाळ यांनी त्यांना उपचारांसाठी फलटण येथील निकोप हॉस्पिटलमध्ये दाखल केले.

सध्या त्यांच्यावर निकोप हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून, शुद्धीत आल्यानंतर ५ मार्च रोजी त्यांनी पोलिसांत जबाब नोंदवला. त्यांच्या या फिर्यादीवरून उदयसिंह निवृत्ती घनवट याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.


Back to top button
Don`t copy text!