
स्थैर्य, 14 जानेवारी, सातारा : येथील अश्वमेध ग्रंथालय व वाचनालय, सातारा यांच्या वतीने देण्यात येणार्या श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज (थोरले) ग्रंथालय पुरस्कारांचे शनिवारी (ता. 17) दुपारी चार वाजता (कै.) भाऊसाहेब सोमण सभागृह, राजवाडा येथे होणार आहे, अशी माहिती ग्रंथालयाचे संस्थापक रवींद्र भारती, अध्यक्ष डॉ. राजेंद्र माने यांनी पत्रकाद्वारे दिली.
पत्रकात म्हटले आहे की, अश्वमेध ग्रंथालय व वाचनालयाच्यावतीने श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज (थोरले) ग्रंथालय पुरस्कार वितरण सोहळा 2026 चे आयोजन करण्यात आले आहे. या पुरस्कार वितरणाचे हे 9 वे वर्ष असून, हा सोहळा या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून बांधकाम व्यावसायिक श्रीधर कंगाळकर उपस्थित राहणार असून त्यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण केले जाईल.
(कै.) ग्रंथमित्र डॉ. शिवाजीराव चव्हाण स्मृत्यर्थ उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार श्री रामदास मोफत वाचनालय, शिरवळ., खंडाळा, (कै.) कवी आनंदा ननावरे स्मृत्यर्थ उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता पुरस्कार कर्हाड येथील सुरुची महिला ग्रंथालयाचे अध्यक्ष डॉ. शर्वरी सारंग बेलापूरकर, (कै.) . वसंतराव बयाजी निकम स्मृत्यर्थ उत्कृष्ट ग्रंथालय कर्मचारी पुरस्कार बोरगाव (ता. कर्हाड) येथील बाळसिद्ध वाचनालयच्या ग्रंथपाल अर्चना सुनील घाडगे, (कै.) डॉ. शीतल अजय देशमुख स्मृत्यर्थ उत्कृष्ट वाचक पुरस्कार व्यंकट किसन लोकरे यांना देण्यात येणार आहे. ग्रंथ चळवळ वृद्धिंगत करणार्या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन साहित्य महामंडळाचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी, कार्यवाह शशीभूषण जाधव, उपाध्यक्ष डी.एम. मोहिते यांनी केले.

