स्थैर्य, फलटण, दि. ३० : आपल्याकडे असलेल्या कलेच्या माध्यमातून काही जनजागृती करता आली तर त्या कलेचा मान राखला जातो,पूजाच होते.याच विचाराने काही कलावंतांनी एकत्र येऊन कोरोनासंदर्भातील जनजागृतीची कविता आपल्या घराच्या रंगमंचावरून व्हिडिओच्या माध्यमातून सादर केली आहे.अत्यावश्यक सेवा पुरवणारे सर्वजण कोरोनासाठी रात्रंदिवस लढत आहेत. या खऱ्या नायकांना प्रेरणा देण्यासाठी आणि लॉकडाऊनमध्ये लोकांनी घरीच बसून राहावे, असा संदेश देणारी ‘सलाम तुम्हाला’ ही कविता आशिष निनगुरकर यांनी व्हिडिओच्या माध्यमातून साकारली आहे.
आशिष निनगुरकर यांनी रंगभूमी आणि टीव्हीवरील कलाकारांकडून मोबाईलद्वारे एक कविता व्हिडीओच्या माध्यमातून तयार करून घेतली आहे. मोबाईल हाच कॅमेरा आणि घर हेच लोकेशन त्यासाठी वापरले आहे. कोरोनापासून बचावासाठी शासनाने काही सुरक्षेचे नियमही घालून दिले आहेत.सर्व नागरिकांनी हे नियम पाळावेत व अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या सर्वांना आम्ही तुमच्यासोबत असल्याची जाणीव या कवितेतून देण्यात आली आहे .या व्हिडीओ कवितेची संकल्पना,काव्यलेखन व दिग्दर्शन आशिष निनगुरकर यांचे आहे.या व्हिडीओमध्ये बालकलाकार चैत्रा भुजबळ,अभिनेत्री श्रीया मस्तेकर, राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेता हंसराज जगताप, लेखक-कवी आशिष निनगुरकर,अभिनेत्री श्वेता पगार, विनोदी अभिनेता गणेश मयेकर, अभिनेते रणजित जोग, ज्येष्ठ अभिनेते जयराज नायर, प्रसिद्ध अभिनेत्री दिपज्योती नाईक व प्रसिद्ध अभिनेते अनंत जोग आदींनी आपल्या कला सादर केल्या आहेत.तसेच या व्हिडिओमध्ये अत्यावश्यक सेवा देणाऱ्या अनेकांची छायाचित्रे टाकून त्यांचे मनापासून आभार मानले आहेत. त्याचे दृश्यसंकलन व संगीत अभिषेक लगस यांनी केले आहे.
अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी जीवाची पर्वा न करता काम करीत आहेत.आपण सर्वांनी घरी राहून त्यांना साथ द्यायला हवी,असे कळकळीचे आवाहन त्यांनी या कवितेतून केले आहे.कोरोनाबद्दल जनजागृती करणाऱ्या या कवितेतला सोशल मीडियावर उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या लॉकडाऊनमध्ये जीवाची पर्वा न करता काम करणाऱ्या सर्व लोकांचा उत्साह वाढविण्याचा प्रामाणिक प्रयत्न या कलेच्या माध्यमातून करण्यात केला आहे. या कवितेच्या संकल्पनेला आणि अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या सर्वांना मनापासून सलाम .