दैनिक स्थैर्य । दि. ०३ मार्च २०२२ । फलटण । सन १९९१ मध्ये नगराध्यक्ष झालो, त्यावेळी तसा माझा आणि फलटणचा फारसा संबंध नव्हता, पण इथल्या जनतेने मला स्विकारले आणि त्यानंतर सर्वात महत्वाचे म्हणजे नगर परिषदेतील कर्मचार्यांनी मला स्विकारले, ही माझ्यासाठी महत्वाची बाब होती, आणि म्हणून त्यांचे आणि माझे प्रेम, आपुलकीचे नाते आजही कायम असल्याचे आ. श्रीमंत रामराजे यांनी स्पष्ट केले. फलटण नगर परिषदेतील निवृत्त कर्मचारी संघटनेच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात अध्यक्ष स्थानावरुन मार्गदर्शन करताना आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर बोलत होते. यावेळी ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नन्स नाशिक रिजनचे रिजनल डायरेक्टर व फलटण नगर परिषद माजी मुख्याधिकारी जीवन सोनवणे, फलटण नगर परिषद निवृत्त मुख्याधिकारी एस. के. देसाई, प्रशासक तथा मुख्याधिकारी संजय गायकवाड, ज्येष्ठ साहित्यिक सुरेश शिंदे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.
फलटणचे नगराध्यक्षपद स्वीकारल्यानंतर एका निमशहरी गावाला कोणत्या सुविधा पुरवाव्या लागतात, याचा अनुभव मला आला, पण या अपेक्षा पूर्ण करीत असताना कर्मचारी आणि अधिकार्यांनी भरपूर मदत केली. मी नवखा असून देखील कर्मचार्यांनी स्विकारले आणि मदत केली. त्या ऋणातून मी कधीच मुक्त होवू शकत नाही. आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी मला मिळाली असल्याचे श्रीमंत रामराजे यांनी आवर्जून सांगितले.
फलटण सारख्या निमशहरी भागात सोयी सुविधा पुरवत असताना सुरुवातीला मी ज्या वॉर्डातून निवडून आलो त्या विद्यानगर भागातही पाणी येत नव्हते, नागरी सुविधा पुरवायच्या असतील तर नगर परिषद आर्थिक दृष्ट्या सक्षम आणि स्वयंपूर्ण करणे गरजेचे असल्याचे लक्षात आले. नगर परिषद अर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी मी प्रयत्न केले. त्यासाठी जेंव्हा जकातीचा ठेका देण्यात आला, तेंव्हा व्यापार्यांनी फलटण शहर बंद केलेले मला आजही आठवत आहे. नागरीकांचे प्रश्न सोडविण्यासाठी आणि त्यांना सोयी सुविधा पुरविण्यासाठी नगर परिषद ही अर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावी, ही आपली ठोस भूमिका त्यावेळी आणि आजही असल्याचे श्रीमंत रामराजे यांनी सांगितले.
आ. श्रीमंत रामराजे म्हणाले, गेल्या ३० वर्षांच्या आपल्या राजकीय आयुष्यातील आजचा कार्यक्रम महत्वाचा आहे. नगर परीषदेतील निवृत्त कर्मचार्यांचे आभार मानण्यासाठी आपण हा कार्यक्रम स्वीकारला असल्याचे सांगत सन १९९१ मध्ये नगर परिषदेत नगराध्यक्ष म्हणून काम करत असतानाचे काही अधिकारी व कर्मचारी आज हयात नाहीत, पण त्यांनी केलेली मदत, सहकार्य, मार्गदर्शन विसरता न येणारे असल्यानेच आज सर्वांचे आभार मानण्यासाठी आपण येथे आलो आहोत.
फलटण हे तसे इतर शहरांच्या तुलनेने स्वच्छ शहर आहे. इथले चतुर्थ श्रेणी कर्मचारी देखील उत्तम प्रकारे काम करत आहेत. फलटणची स्वच्छता असेल, इथले पाणी असेल आणि इथले वातावरण असेल, हे सर्वांसाठीच पोषक आहे. फलटणला उन्हाळा सोडला तर बाकी वातावरण चांगले असते. एवढे सगळे चांगले असताना नागरीकांच्या अपेक्षा मात्र मर्यादित असतात. त्या अपेक्षा तेंव्हाही होत्या आणि आजही असतात. त्या पूर्ण करण्याकडे आमचा सतत प्रयत्न असल्याचे श्रीमंत रामराजे यांनी स्पष्ट केले.
येथे आलेले प्रत्येक मुख्याधिकारी सुद्धा चांगले होते. फलटणला चांगले, स्वच्छ आणि सुंदर शहर करण्यासाठी बाहेरुन आलेल्या या अधिकार्यांनीही आम्हाला साथ दिली. फलटणला स्थायिक होऊन राहण्यासाठी चांगले वातावरण आहे, ते कायम ठेवणे, प्रसंगी त्यामध्ये सुधारणा करणे हे येथे आलेल्या प्रत्येक मुख्याधिकारी यांनी पाहिले आणि त्याप्रमाणे सुधारणा करण्याचा यशस्वी प्रयत्न त्यांनी आणि आम्ही एक विचाराने तेंव्हा पासून केल्याचे, श्रीमंत रामराजे यांनी स्पष्ट केले.
कर्मचारी निवृत्त झाले आहेत, पण कर्मचारी हा निवृत्त होवू शकत नाही. त्यांना माणसांखेरीज करमूच शकत नाही. त्यामुळे तुम्ही निवृत्त जरी झाला असाल तरी तुम्ही दिशा बदलली आहे, एवढेच लक्षात ठेवा, असा सल्लाही श्रीमंत रामराजे यांनी दिला.
नागरीकांना पूर्ण क्षमतेने सेवा देण्यासाठी नगर. परिषदेच्या माध्यमातून आपल्याला अधिक चांगले काम करायचे आहे. जन्माचा दाखला, मृत्यूचा दाखला यासह इतर सुविधा असतील, या सुविधा देण्यासाठी राजकारण विरहीत एखादी चळवळ उभी करता आली तर त्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. या कामासाठी निवृत्त मुख्याधिकार्यांची आपण मदत घेवू, असे श्रीमंत रामराजे यांनी स्पष्ट केले.
आज मुंबई, पुण्यासारख्या मोठ्या शहरातील वाढती लोकवस्ती आणि त्या वाढत्या लोकवस्तीला पुरेशा नागरी सुविधा देण्यासाठी नगर विकास विभागाचा बहुतांश निधी या शहरांकडे वळविला जात असल्याने राज्यातील ब आणि क वर्ग नगर परिषद किंवा निमशहरी भागातील नागरी सुविधांना पुरेसा निधी उपलब्ध होत नसल्याने तेथील नागरिकांची कुचंबना टाळण्यासाठी आणि मुंबई पुण्यातील वाढत्या लोकवस्तीची समस्या दूर करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने लगतच्या छोट्या शहरात दर्जेदार नागरी सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी छोट्या शहरांना आवश्यक मदत करण्याची गरज आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी स्पष्टपणे नमूद केली.
आ. श्रीमंत रामराजे म्हणाले, पुण्या – मुंबई ऐवजी फलटणसारखी आजूबाजूची गावे स्मार्ट सिटी म्हणून विकसीत करण्याची गरज आहे. तेथे कदाचित शिक्षणाची कमतरता असेल किंवा इतर उणीवा असतील तर त्याची पूर्तता करुन देता येईल, पण फलटणसारखी शहरे विकसीत झाली पाहिजेत.
दरम्यान, ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता, माजी मुख्याधिकारी जीवन सोनवणे, ज्येष्ठ साहित्यीक सुरेश पा. शिंदे, विद्यमान मुख्याधिकारी तथा प्रशासक संजय गायकवाड यांनी मनोगते व्यक्त केली.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने संघटनेचे मार्गदर्शक जीवन केंजळे, अध्यक्ष अनिल माधव अहिवळे, उपाध्यक्ष धनराज लक्ष्मण पवार, सचिव श्रीपाद कुलकर्णी, खजिनदार सदाशिव जगदाळे, कार्यकारिणी सदस्य दिलीप मठपती, विजय पालकर, राजेंद्र काकडे यांच्यासह सर्व सभासदांनी आगामी काळात संघटना अधिक मजबुत करण्याबरोबर सेवानिवृत्ती नव्हे दिशा बदल या श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या सूचनेप्रमाणे भविष्यात एकादा सेवाभावी उपक्रम सुरु करण्याचा निर्धार केला आहे.
निवृत्त शहर अभियंता जीवन केंजळे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. सौ. दिपाली निंबाळकर यांनी सूत्र संचालन केले.