निवडणूक जवळ आल्यानेच सत्ताधाऱ्यांचा दिखावा करण्याचा उद्योग – अशोक मोने

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २५ डिसेंबर २०२१ । सातारा । गेल्या साडेचार वर्षात नगर पालिकेला भ्रष्टाचाराचे कुरण बनवून अक्षरशः लुटले. केवळ टेंडर, बिल, टक्केवारी आणि पैसे खाणे हाच उद्योग पालिकेत सुरु होता. आता शेवटचे तीनचार महिनेच उरल्याने आम्ही किती काम करतोय, हे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न करून सातारकरांची सहानुभूती मिळवण्याचा खटाटोप सुरु असल्याची टिका विरोधी पक्षनेते अशोक मोने यांनी केली. प्रशासकीय मान्यता नाही आणि निधीही उपलब्ध नाही, असे असताना नूतन प्रशासकीय इमारतीच्या भूमिपूजनाचा घाट का घातला, हे सुज्ञ सातारकर ओळखून आहेत. सत्ताधाऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकली असून तुम्ही कितीही दिखावा केला तरी सत्ता बदल होणारच, असे मोने यांनी पत्रकात म्हटले आहे.

कमिशन, टक्केवारी आणि टेंडरसाठी सत्ताधारी नगरसेवकांच्या कळवंडी सातारकरांनी उघड्या डोळ्यांनी पाहिल्या असा आरोप करत मोने पुढे म्हणतात गेल्या साडेचार वर्षात पालिकेतील भ्रष्ट कारभाराने कळस गाठला असून निवडणूक जवळ आल्याने सत्तेचा स्वार्थ डोळ्यासमोर ठेवून साताऱ्यात नारळ फोडण्याचा सपाटा सत्ताधारी आघाडीच्या नेत्यांनी सुरु केला आहे. पालिकेच्या ज्या नूतन इमारतीचे भूमिपूजन थाटात करून आम्ही किती काम करतोय हे बेंबीच्या देठापासून ओरडून सत्ताधारी सांगत आहेत, त्या प्रशासकीय इमारतीला अद्यापही तांत्रिक मान्यता नाही. प्रशासकीय मान्यतेचा तर पत्ताच नाही. टेंडर प्रक्रियेचे तर सोडाच खर्च किती होणार हेही माहिती नाही आणि निधी कोठून उपलब्ध करणार याचा थांगपत्ताच नाही. असे असताना त्याच इमारतीचे भूमिपूजन करण्याचा घाट सत्ताधाऱ्यांनी का घातला, हे सातारकर पुरते ओळखून आहेत.

नूतन प्रशासकीय इमारतीचे काम पालिकेच्या स्वउत्पन्नातून करण्यासारखी पालिकेची आर्थिक परिस्थिती नाही. शासनाच्या कोणत्या योजनेतून हे काम घेतलंय तेही कोणाला माहिती नाही आणि कोणत्याही शासकीय योजनेतून या कामाला मंजुरी मिळालेली नाही. असे असताना केवळ सातारकरांची दिशाभूल करण्यासाठी आणि राजकीय स्वार्थ साधण्यासाठी फसवणुकीचा उद्योग सत्ताधारी करत आहेत. सत्ता मिळाल्यापासून पालिकेत फक्त लुटालूट करण्याशिवाय कोणतेही काम केले नाही. आता शेवटचे दोनचार महिने उरल्याने आम्ही कसा विकास करतोय हे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न करून ‘स्वप्नपूर्ती’ या गोंडस शब्दाखाली सातारकरांवर भूलभुलैया केला जात आहे. गेल्या साडेचार वर्षात खाबुगिरीऐवजी विकासकामे केली असती तर आज ‘काय बाय सांगू, कसं गं सांगू’ म्हणण्याची वेळ आली नसती. तुमची कामे आणि तुमचा विकास काय आहे, हे सातारकरांना कळून चुकले आहे. त्यामुळे कितीही नारळ फोडा आणि कितीही भूलथापा मारा निवडणुकीत सत्ता पालट करून सातारकर तुम्हाला धडा शिकवतील, असा इशारा मोने यांनी दिला आहे.

कुठे आहे सर्वसामान्य महिला?

ज्या सर्वसामान्य घरातील महिलेला सातारकरांनी मोठ्या अपक्षेने नगराध्यक्ष केले त्या नगराध्यक्षांना कुठे गायब करून ठेवले आहे? त्यांचे अपहरण झालेय कि काय, असा प्रश्न सातारकर विचारत आहेत. एवढे नारळ फुटले पण, नगराध्यक्षा मात्र एकाही कार्यक्रमात दिसल्या नाहीत, याचे गौडबंगाल काय? कुठे आहे सर्वसामान्य घरातील महिला, याचे उत्तर देण्याचे धाडस सत्ताधारी दाखवतील, असा खोचक टोलाही मोने यांनी लगावला आहे.


Back to top button
Don`t copy text!