फलटणमधील यशवंतराव चव्हाण हायस्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स लॅब’ सुरू; डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके) यांची माहिती

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. १७ जुलै २०२४ | फलटण |
फलटणमधील यशवंतराव चव्हाण हायस्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये ‘हायटेक इनोव्हेशन लॅब’ सुरू करण्यात आली आहे. फलटणमध्ये नव्हे तर सातारा जिल्ह्यात प्रथमच ‘हायटेक इनोव्हेशन लॅब’ सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे मानद सचिव डॉ. सचिन सुभाषराव सूर्यवंशी (बेडके) यांनी दिली.

श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय कर्मयोगी नामदेवराव बळवंतराव सूर्यवंशी (बेडके) यांचा २९ वा स्मृतिदिन १६ जुलै २०२४ श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या यशवंतराव चव्हाण हायस्कूल व ज्युनियर कॉलेज फलटण येथे साजरा करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

प्रारंभी कर्मयोगी स्व. नामदेवराव सूर्यवंशी (बेडके) यांच्या प्रतिमेचे पूजन श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष श्री. बापूसाहेब मोदी, श्री. सी. एल. पवार, संस्थेचे मानद सचिव डॉ. सचिन सुभाषराव सूर्यवंशी (बेडके), संस्थेचे सदस्य श्री. शिवाजीराव सूर्यवंशी (बेडके), श्री. प्रकाश तारळकर, श्री. हनुमंतराव निकम तसेच फलटण तालुक्यातील पत्रकार यांच्या उपस्थितीत झाला.

यावेळी डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके) यांनी आपल्या मनोगतात संस्थापक अध्यक्ष कर्मयोगी नाना व कै. सुभाषकाका यांनी संस्थेच्या विकासासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल गौरवोद्गार काढले. ते म्हणाले की, फलटणमध्ये प्रथमच आंतरराष्ट्रीय दर्जाचे आधुनिक तंत्रज्ञानाचे शिक्षण श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटण व गुरुजी एअर इंटरनॅशनल पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आपल्या विद्यालयात ‘हायटेक इनोव्हेशन लॅब’ शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून रोबोटिक्स, थ्री डी प्रिंटर, ड्रोन व्हर्च्युअल, रियालिटी रॉकेट, लॉन्चर, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, इंटरनेट इ. कोर्सेस सुरू करण्यात येणार आहेत. फलटणमध्ये नव्हे तर सातारा जिल्ह्यात प्रथमच आर्टिफिशियल इंटेलिजन्सची लॅब सुरू करण्यात आली आहे.

याप्रसंगी गुरुजी एअर इंटरनॅशनल हायटेक लॅबबद्दल त्यांनी माहिती सांगितली व मान्यवरांच्या हस्ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स व रोबोटिक्स लॅबचे उद्घाटन केले. माहिती तंत्रज्ञानाच्या युगामध्ये या लॅबची उपयुक्तता त्यांनी स्पष्ट केली.

या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ पत्रकार श्री. रवींद्र बेडकिहाळ, स. रा. मोहिते (दादा), प्रा. रमेश आढाव, श्री. किरण भोळे, श्री. काकासाहेब खराडे, श्री. योगेश गंगतीरे, श्री. प्रसन्ना रुद्रभटे, श्री. सचिन मोरे, श्री. मिंड सर, श्री. भाऊसो निकम, श्री. अभिषेक सरगर, श्री. नासीर भाई शिकलगार आदी पत्रकार तसेच चारही शाखांचे प्राचार्य, उपप्राचार्य, पर्यवेक्षक, शिक्षक-शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. यादव एस. डी. यांनी केले.

या कार्यक्रमाचे नियोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य श्री. थोरात एस. बी. व ज्येष्ठ शिक्षक श्री. खरात के. एच. यांनी केले.


Back to top button
Don`t copy text!