स्थैर्य, सातारा, दि.१९: महाराष्ट्रासह गुजरात, कर्नाटक, मध्यप्रदेश, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश राज्यात बँक एटीएम मशीनमध्ये छेडछाड करून लाखो रुपयांवर डल्ला मारणार्या आंतरराज्य टोळीचा शाहूपुरी पोलिसानी जेरबंद केले आहे. हरियाणामध्ये कारमधून पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी पाठलाग करून दोघांना ताब्यात घेतले. सकरुद्दीन फैजरु वय 36 रा.घागोट, ता. जि. पलवल (हरीयाणा) आणि रवि ऊर्फ रविंदर चंदरपाल वय 33 रा. मोहननगर, पलवल रेल्वेस्टेशनजवळ ता. पलवल (हरीयाणा) अशी संशयितांची नावे आहेत.
याबाबत माहित अशी, दि. 20 सप्टेंबर व दि.21 सप्टेंबर रोजी राधिका चौकातील कॅनरा बँकच्या एटीएममधून अनोळखी इसमांनी एटीएममध्ये छेडछाड करुन हातचलाखीने 2 लाखाची रक्कम काढुन बँकेची फसवणुक केली होती. याबाबत बँकेचे मॅनेजर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शाहुपुरी पोलीस ठाण्यात 05 ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर माहिती घेत असतांना जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून बँकाचे एटीएममधून हातचलाखीने मोठ्या प्रमाणावर रोख रकमा काढण्याचे प्रकार होत असल्याने वरिष्ठ अधिकार्यांनी यात लक्ष घालून शाहुपुरी पोलीस ठाण्यास तपास करण्याच्या मार्गदशन करून सुचना दिलेल्या होत्या. त्याप्रमाणे सहा.पोलीस निरीक्षक विशाल वायकर, सपोनि संदीप शितोळे व गुन्हे प्रकटीकरण शाखेने सदर गुन्हयाचे घटनास्थळी कॅनरा बँक राधिकारोड सातारा येथे भेट देवुन पाहणी केली होती. त्याठिकाणचे व परिसराचे सीसीटीव्ही फुटेज तपासले होते. फुटेज व तांत्रिक बाबींचे विश्लेषण करुन आरोपीबाबत महत्वपुर्ण धागेदोरे प्राप्त केले. गुन्ह्याच्या तपासामध्ये गुन्हयातील आरोपी हरीयाणा राज्यातील असल्याची व त्यांनी महाराष्ट्रासह गुजरात, कर्नाटक, राजस्थान, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, हरियाणा राज्यात मोठ्या प्रमाणावर एटीएममध्ये छेडछाड करुन हातचलाखीने डल्ला मारल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. सदरची माहिती समोर येताच वरिष्ठाच्या आदेशाने शाहुपुरी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सपोनि संदीप शितोळे, पो.ना. स्वप्निल कुंभार, पो. कॉ. मोहन पवार, पो. कॉ. पंकज मोहिते यांचे पथक हरीयाणा राज्यात रवाना झाले होते. या पथकाने आरोपींबाबत अत्यंत कौशल्यपुर्ण माहिती प्राप्त करुन आरोपींना स्थानिक पोलीसांचे मदतीने आरोपी बलेनो वाहनातून पळून जात असतांना पाठलाग करुन दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे.
आरोपी हे त्याठिकाणचे सराईत गुन्हेगार असल्याची व त्यांच्यावर मोठ्या प्रमाणावर अशा प्रकारचे गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. आरोपीकडुन गुन्ह्यातील 1 लाख 50 हजार रोख रक्कम व गुन्हा करण्यासाठी वापरलेली 4 लाखांची बलेनो कार व 2 मोबाईल हॅन्डसेट असा एकुण 5 लाख 61 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यातत आला आहे.
अटक केलेल्या दोन्ही आरोपींना मा. हु. न्यायालयात हजर केले असता त्यांची 03 दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. आरोपींनी महाराष्ट्र राज्यात 440 तसेच गुजरात -64, कर्नाटक -102, राजस्थान -24, मध्यप्रदेश -29, उत्तर प्रदेश 02, हरियाणा 43 असे एकुण 711 वेळा ट्रँन्डीक्शन करुन एटीएममधून लाखो रुपयांची रक्कम काढुन डल्ला मारल्याचे समोर आले आहे. या गुन्हयाचा पुढील तपास स.पो.नि.श्री वायकर हे करीत आहेत.
पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अप्पर पोलीस अधिक्षक धीरज पाटील, सातारा विभागाच्या सहा.पोलीस अधीक्षक श्रीमती आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली शाहुपुरीचे सहायक पोलीस निरीक्षक विशाल वायकर, सहा.पोलीस निरीक्षक संदिप शितोळे यांच्यासह गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पो.हेड.कॉ. हसन तडवी, पोलीस नाईक लैलेश फडतरे, अमित माने, स्वप्निल कुंभार, पो. कॉ. ओंकार यादव, मोहन पवार, पंकज मोहिते, महेंद्र भिल्ल, चालक अभिजीत सावंत यांनी अथक परिश्रम घेवून तांत्रिक बाबींचे विश्लेषणाद्वारे सदरचा गुन्हा उघडकीस आणला आहे व परराज्यात जावून आरोपी पकडुन कौतुकास्पद कामगिरी केली आहे.