दैनिक स्थैर्य । दि. २० मे २०२२ । खंडाळा । शिंदेवाडी गावच्या हद्दीमध्ये एका आंतरराष्ट्रीय कंपनीच्या उपाध्यक्षांवर भंगाराचा ठेका बदलल्याच्या कारणावरून जिवघेणा हल्ल्याप्रकरणी मुख्य सूत्रधार मुख्य सूत्रधार दिवेश बाळकृष्ण यादव (वय २८,रा. भेकराईनगर,हडपसर,पुणे) याला शिरवळ पोलीसांनी तब्बल ५ महिन्याच्या कालावधीनंतर मोठ्या शिताफीने जेरबंद केले आहे.
याबाबतची शिरवळ पोलीसांनी दिलेली अधिक माहिती अशी कि, विंग ता.खंडाळा गावच्या हद्दीमध्ये एक आंतरराष्ट्रीय कंपनी आहे. याठिकाणी मानव संसाधन विभागामध्ये (एचआर) म्हणून किरण रतिलाल कटारिया (वय ५२,रा.पुणे ) हे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहे. दरम्यान, सोमवार दि.२७ डिसेंबर रोजी किरण कटारिया हे कंपनीमधील कामकाज उरकून कंपनीच्या कार क्र.( एमएच-१२-आरएफ-४३९३) मधून चालक अमर दत्तात्रय सोनावणे (वय २९, सध्या रा. पुणे मूळ रा.मिरजे ता. खंडाळा) यांच्यासमवेत सायंकाळी ४.४० वाजण्याच्या सुमारास पुणे याठिकाणी जात असताना भोर-शिरवळ रस्त्यावर एका हॉटेलजवळ पाठीमागून आलेल्या दुचाकीवरील अनोळखी व्यक्तींनी दुचाकी कारला आडवी मारत कार थांबविली. दरम्यान,संबंधितांनी कारचालकाच्या बाजूकडील काच धारदार शस्त्राने जोरात फोडत कारचालक अमर सोनावणे याच्या मानेवर कोयत्याने जिव घेण्याच्या उद्देशाने वार करीत गंभीर जखमी केले.
त्याचप्रमाणे कारमधील कंपनीचे उपाध्यक्ष किरण कटारिया यांना संबंधितांनी कारमधून शिवीगाळ, दमदाटी करीत खाली ओढून कंपनीचा भंगाराचा ठेका बदलल्याच्या कारणावरून कोयत्याने जीवे मारण्याच्या उद्देशाने हल्ला करीत गंभीर जखमी करीत कारचेही नुकसान केले.
यावेळी शिरवळ पोलीस स्टेशनला किरण कटारिया यांनी फिर्याद दाखल केल्यानंतर शिरवळ पोलीसांनी चक्रे वेगाने फिरवत भंगाराचा ठेका बदलल्याच्या कारणावरून हल्ल्याप्रकरणी सूत्रधार भंगार व्यवसायिक राजू जोखणप्रसाद गुप्ता (वय ४९,रा. पूर्णानगर,चिंचवड,पुणे), सराईत गुन्हेगार ऋषीकेश विजय रणवरे (वय २१, सध्या रा. गुठाळे ता.खंडाळा मूळ रा.राख ता.पुरंदर जि.पुणे), रामकृष्ण सुभाष अळगी (वय ३१, रा. अपर इंदिरानगर,पुणे) करण विठ्ठल शिंदे (वय २१,रा.बालाजीनगर,पुणे),निखिल अशोक जाधव (रा.वडवाडी ता.खंडाळा),नितीन गोपीनाथ फुलारे (वय २१,रा.बिबवेवाडी,पुणे),नंदलाल उर्फ बंटी वसंत महांगरे (वय २६,रा.गुठाळे ,विंग ता.खंडाळा),सचिन मानसिंग गायकवाड (वय ४२,रा.आकुर्डी,पुणे) यांच्या मुसक्या यापूर्वीच शिरवळ पोलीसांनी आवळल्या. तर या हल्ल्यामागचा मुख्य सूत्रधार दिवेश यादव हा फरार झाला होता. दरम्यान,सातारा व मुंबई उच्च न्यायालयाने हल्ल्याप्रकरणी शिरवळ पोलीस स्टेशनच्या हरकतीनंतर दिवेश यादव याचा अटकपूर्व जामीन फेटाळला होता. यावेळी दिवेश यादव याला शिरवळ पोलीसांनी मोठ्या दिताफीने अटक करीत पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ हे करीत आहे.