
दैनिक स्थैर्य । दि.१२ मे २०२२ । सातारा । शहरासह हद्दवाढ भागासाठी शासनाकडून वेळोवेळी निधी प्राप्त होत आहे. त्यामुळे विकासकामांमध्ये कोणताही अडथळा राहिलेला नाही . प्रशासनाने नियोजित व हद्दवाढ भागातील पायाभूत कामे तातडीने हाती घेऊन ती मार्गी लावावीत,’ अशा सूचना खासदार उदयनराजे भोसले यांनी केल्या.
सातारा विकास आघाडीचे पदाधिकारी, अधिकारी व हद्दवाढ भागातील नागरिकांच्या उपस्थितीत बुधवारी सकाळी खा. उदयनराजे यांच्या जलमंदिर पॅलेस या निवासस्थानी आढावा बैठक पार पडली. या बैठकीत ते बोलत होते. यावेळी मुख्याधिकारी अभिजित बापट, नगर अभियंता दिलीप चिद्रे, मनोज शेंडे, किशोर शिंदे, वसंत लेवे, सुहास राजेशिर्के, राजू भोसले, सुजाता राजेमहाडिक, स्मिता घोडके, निशांत पाटील यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
पालिकेच्या माध्यमातून शहरात सुरू असलेल्या विकासकामांचा आढावा घेऊन खा. उदयनराजे म्हणाले, शहरात रस्ते, गटारे, दिवाबत्ती अशी कामे प्रगतीपथावर आहेत. नव्याने पालिकेत समाविष्ट झालेल्या दरे, शाहूपुरी, शाहूनगर, खेड, विलासपूर या भागातही अशी कामे गतीने व्हायला हवीत. शासनाकडून नुकताच या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे पालिकेने पायाभूत कामांची यादी तयार करून ती टप्प्याटप्प्याने मार्गी लावावीत.
वर्क ऑर्डर देऊनही काही कामे सुरू न झाल्याने खा. उदयनराजे यांनी नाराजी व्यक्त केली. साहित्याचे दर वाढल्याने ही कामे काही काळ रखडल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, या बैठकीत नगरसेवकांसह नागरिकांनी देखील आपले गाऱ्हाणे मांडले. काहिंनी शहरातील अतिक्रमणाच्या विषयावर लक्ष वेधले. हा प्रश्न गांभिर्याने घ्यावा, अनावश्यक अतीक्रमणे तातडीने हटवावीत, असे आदेश यावेळी खा. उदयनराजे यांनी दिले.
उदयनराजे काय म्हणाले
– मंगळवार तळे मार्ग, पोवई नाक्यावरील अतिक्रमणे हटवा
– गोलबाग व आळूचा खड्डा येथे घाण टाकल्यास चौपाटी बंद
– रस्त्यावर वर्षानुवर्षे उभ्या असलेल्या गाड्या वाहतूक शाखेने हटवाव्यात
– ज्या हातगाड्या सुरू नसतील त्या तातडीने काढून रस्ता मोकळा करा