दैनिक स्थैर्य । दि. १८ एप्रिल २०२२ । बीड । केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांच्या उपस्थितीत आरोग्यवर्धनी योग दिवस साजरा करण्यात आला. बीड तालुक्यातील चौसाळा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरात कार्यक्रमाचे आज आयोजन करण्यात आले होते. यावेळी आशा सेविका, अंगणवाडी सेविका, आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी- कर्मचारी आदी उपस्थित होते.
याप्रसंगी जिल्हा आरोग्य अधिकारी श्री अमोल गीते यांच्याकडून त्यांनी आरोग्य विषयक उपाय योजनांची माहिती घेतली . याप्रसंगी बोलताना केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री श्रीमती पवार म्हणाल्या. कोरोना लॉकडाउनच्या काळात केंद्र शासनाने वैद्यकीय सुविधांमध्ये वर मोठ्या प्रमाणात तरतूद केली तसेच कोरोना प्रतिबंधासाठी लसीकरण मोहीम यशस्वी करताना महाराष्ट्र मोठ्या प्रमाणात कोरोना लसींचा साठा उपलब्ध करून दिला आहे, असे त्यांनी सांगितले.
केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती पवार यांचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय अंतर्गत आयुष्यमान भारत उपक्रमातील कार्यक्रमासाठी दोन दिवसीय दौऱ्यावर बीड जिल्ह्यात आल्या आहेत. काल सायंकाळी त्यांचे बीड येथे आगमन झाले त्यावेळी त्यांचे स्वागत खासदार प्रीतम मुंडे यांनी केले. त्यावेळी विविध पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.