स्थैर्य, सातारा, दि.२५: क्षेत्र महाबळेश्वर परिसरात ढगफुटी झाली.सर्वत्र गारांचा मोठा पाऊस झाला. गारांचे प्रमाण एवढे होते की रस्त्यावर जंगलात गारांची चादर पसरली होती. सातारा जिल्हा परिसरातील अनेक गावांमध्ये दुपारी हलका व मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला मात्र क्षेत्र महाबळेश्वर येथे ढग फुटी सदृश्य परिस्थिती पाहण्यास मिळाली.यामुळे स्ट्रॉबेरी व शेती पिकाचे मोठे नुकसान झाले. मागील दोन दिवसांपासून शहर व परिसरात पावसाची संततधार सुरु आहे तर आज बुधवारी शहरासह परिसरात पावसाने एक ते दीड तास धुवाधार गारांचा पाऊस झाला.
मात्र क्षेत्र महाबळेश्वर परिसरात ढग फुटी प्रमाणे सर्वत्र गारांचा मोठा वर्षाव झाला.यामुळे सर्वत्र गारांचा खच पडला होता. रस्त्यावर जंगली भागात जिकडे बघावे तिकडे पांढरा गारांचा थर दिसून येत होता. या पावसामुळे वाहतूक काही वेळ प्रभावित झाली होती. वाहनचालकांना रस्त्यावरील गारा बाजूला करतच मार्गक्रमण करावे लागले.अनेक वाहन चालकांनी जोरदार पाऊस,गारांचा वर्षाव यामुळे क्षेत्र महाबळेश्वर ,ऑर्थर सीट पाईंट आदी रस्त्यावर आहे त्या ठिकाणी आपली वाहने उभी केली . पाऊस थांबल्यानंतर गारा बाजूला करत रस्ते मोकळे केले व नंतरच वाहतूक संथ गतीने सुरू झाली. आज या परिसरात पहिल्यांदाच एवढा मोठा गारांचा पाऊस झाल्याचे स्थानिकांनी सांगितले. सातारा जिल्ह्यातील वाई, पाचगणी, पुणे-बंगळूर महामार्ग ,मांढरदेव आदी परिसरातही हलका व मध्यम दर्जाचा अवकाळी पाऊस झाला. मात्र क्षेत्र महाबळेश्वर परिसरातील गारांच्या पावासाने सर्वत्र पाणी पाणी केले.
क्षेत्र महाबळेश्वर ते ऑर्थरसीट पॉईंट पर्यंतच्या रस्त्यावर सर्वत्र बर्फाची सहा इंचाची चादर पसरल्याचे चित्र पहावयास मिळाले.सर्वत्र रस्त्यांवर लांबपर्यंत बर्फाची चादर पसरल्याचे दृश्य पाहावयास मिळाले. अनेक हौशी पर्यटकांनी या बर्फात मनसोक्त खेळण्याचा आनंद लुटला . रस्त्यांवर लांबपर्यंत पडलेल्या बर्फाचा खच यांमुळे मात्र वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.
क्षेत्र महाबळेश्वर परिसरात गारांसह मोठस पाऊस झाला आहे. मात्र या पावसाने कोणतेही नुकसान झाल्याची माहिती अजून पर्यंत मिळालेले नाही असे तहसीलदार सुषमा पाटील यांनी सांगितले.