
स्थैर्य, मुंबई, दि.५: बॉलिवूड अभिनेता-दिग्दर्शक अरबाज खान, सोहेल खान आणि त्याचा मुलगा निर्वाण खान यांना वांद्रे येथील हॉटेल ताज लँड्स अँड येथे क्वारंटाइन करण्यात आले आहे. सोमवारी रात्री दहा वाजताच्या सुमारास या तिघांनाही हॉटेलमध्ये क्वारंटाइन करण्यात आले आहे.
या तिघांनाही आठवड्याभरासाठी हॉटेलमध्ये क्वारंटाइनमध्ये राहावे लागणार आहे. अरबाज, सोहेल आणि निर्वाण यांच्या विरोधात सोमवारी मुंबईतील खार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने सोशल मीडिया पोस्टद्वारे अरबाज खान, सोहेल खान आणि त्याचा मुलगा निर्वाण यांना हॉटेल ताज लँड्स अँड येथे क्वारंटाइन करण्यात आले असल्याची माहिती दिली आहे. स्वखर्चावर या तिघांना हॉटेलमध्ये राहावे लागणार असल्याचे या पोस्टमध्ये सांगण्यात आले आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
अरबाज, सोहेल आणि निर्वाण यांनी कोरोना प्रोटोकॉलच्या नियमांचे उल्लंघन केले होते. हे तिघेही 25 डिसेंबर रोजी दुबईहून भारतात परतले होते. मुंबईत परतल्यानंतर त्यांना नियमाप्रमाणे 14 दिवसांच्या संस्थात्मक विलगीकरणात राहायचे होते. त्यानुसार त्यांचे बुकिंग हे हॉटेल ताज लँड्स अँड येथे करण्यात आले होते. मात्र हे तिघेही तिथे न जाता परस्पर घरी निघून गेले होते. 26 डिसेंबर रोजी महापालिकेने जेव्हा आढावा घेतला, तेव्हा ते तिघे तिथे गेलेच नसल्याचे समोर आले. हे तिघेही परस्पर घरी गेल्याचे उघडकीस आले. त्यानंतर या तिघांविरोधात साथरोग प्रतिबंधक कायद्याद्वारे महापालिकेकडून खार पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला होता.
नव्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर नियमांनुसार, ब्रिटन आणि यूएईवरुन महाराष्ट्रात आलेल्या प्रवाशांना 14 दिवसांच्या संस्थात्मक विलगीकरणात राहावे लागते.