पुणे जिल्ह्यात येरवडा येथे नवीन आयटीआय सुरू करण्यास मान्यता

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २८ एप्रिल २०२२ । पुणे । पुणे जिल्ह्यातील येरवडा येथे औद्योगिक प्रशिक्षण संस्था- आयटीआय सुरु करणे व या संस्थेसाठी पदनिर्मितीच्या प्रस्तावास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. या निर्णयानुसार या संस्थेसाठी ४० पदांची निर्मिती करण्यात येणार आहे.

पुणे जिल्ह्यामध्ये औद्योगिक आस्थापना, औद्योगिक समूह यांची मोठी संख्या आहे. येरवडा व नगररोड या क्षेत्रात रांजणगाव, चाकण एम.आय.डी.सी. हे आशिया खंडातील नामांकित उद्योगक्षेत्र आहेत. या ठिकाणी फियाट, बजाज इलेक्ट्रीकल, एल.जी. इलेक्ट्रॉनिक्स, हायर इंडिया लि. येझाकी, बेकर गेजेस आदी ऑटोमोबाईल, मॅन्युफॅक्चरिंग, इलेक्ट्रीकल, इलेक्ट्रॉनिक्स अशा विविध क्षेत्रातील उद्योग आहेत.

पुणे शहर व जिल्ह्यातील अनेक होतकरू उमेदवारांना या परिसरातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील सध्याच्या मंजूर संख्येवरील जागांवर प्रशिक्षणासाठी प्रवेश मिळणे दुरापस्त होत आहे. त्यानुसार स्थानिक गरजा तसेच मागणी विचारात घेऊन येरवडा येथे आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित नवीन औद्योगिक प्रशिक्षण संस्था सुरु करण्यास मान्यता देण्यात आली. या आयटीआय मधील 18 तुकडया व त्यासाठी आवश्यक 23 शिक्षकीय व 17 शिक्षकेतर अशा एकूण 40 पदनिर्मितीच्या प्रस्तावासही मान्यता देण्यात आली.

या आयटीआयमधील यंत्रसामुग्री, हत्यारे याकरिता 2022-23 या आर्थिक वर्षासाठी 5कोटी 55लाख 63 हजार रुपयांच्या अनावर्ती खर्चाकरिता व 40 शिक्षक व शिक्षकेतर पदांच्या वेतन व इतर अनुषंगिक बाबींकरिता प्रतिवर्षी आवर्ती खर्चासाठी 2 कोटी 25 लाख 63 हजार रुपयांच्या इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली. या संस्थेकरिता शिक्षक व शिक्षकेतर पद निर्मितीसाठी उच्चस्तरीय सचिव समितीची मान्यता घेण्यात येणार आहे.


Back to top button
Don`t copy text!