स्थैर्य,सातारा, दि.२: सातारा जिल्ह्याच्यादृष्टीने अतिशय जिव्हाळ्याचा प्रश्न बनलेल्या मेडीकल कॉलेज उभारणीसाठी मूर्त स्वरूप प्राप्त झाले असून कॉलेजसाठीची जागा हस्तांतरण, १०० विध्यार्थी क्षमतेचे महाविद्यालय आणि ५०० खाटांचे रुग्णालय उभारणीसाठी एकूण ४९५ कोटी ४६ लाख एवढ्या निधीला प्रशासकीय मान्यता मिळवून दिल्यानंतर आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश मिळाले आहे. त्यांच्या पाठपुराव्यामुळे आणि ना. अजित पवार यांच्या सहकार्यामुळे सातारच्या मेडिकल कॉलेजसाठी अधिष्ठाता, प्राध्यापक आदी एकूण ५१० पदांची निश्चिती करण्यात आली असून हि पदे भरण्यास राज्य शासने मान्यता दिली आहे. लवकरच हि पदे भरली जाणार असून मेडिकल कॉलेजच्या प्रवेश प्रक्रियेचा मार्ग मोकळा होणार आहे. मेडिकल कॉलेजचा प्रश्न पूर्णतः मार्गी लावल्याद्दल आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे जिल्हावासियांच्यावतीने आभार मानले आहेत.
गेले अनेक दिवसांपासून सातारा येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रश्न गाजत होता. मेडिकल कॉलेजला मंजुरी मिळाल्यानंतर आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी ना. अजित पवार यांची भेट घेवून सातारा जिल्ह्याचा मेडीकल कॉलेजचा प्रश्न मार्गी लागण्यासाठी वाढीव जागा हस्तांतरणाचा प्रश्न सोडवला. त्यावेळी वाढीव ६० एकर जागा हस्तांतरणाचा निर्णय घेण्यात आला. आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या मागणीला प्राधान्य देत ना. अजित पवार आणि ना. अमित देशमुख यांच्या सूचनेवरून सातारा येथे १०० विध्यार्थी क्षमतेचे महाविद्यालय आणि ५०० खाटांचे रुग्णालय उभारणी व अनुषांगिकबांधकामाच्या अंदाजपत्रकास महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने मान्यता दिली. त्यासाठी एकूण ४९५ कोटी ४६ लाख एवढ्या निधीला मंजुरी दिली होती.
दरम्यान, मेडिकल कॉलेजसाठी आवश्यक असणारी पद निर्मिती करावी आणि ही सर्व पदे भरून प्रत्यक्ष मेडिकल कॉलेज सुरु करावे अशी मागणीही आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी ना. पवार यांच्याकडे त्याचवेळी केली होती. याबाबत आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी पत्रव्यवहारही केला होता. मेडिकल कॉलेजसाठी निधी उपलब्ध झाला असून उभारणीही सुरु होणार आहे. मात्र प्रत्यक्ष कॉलेज सुरु होण्यासाठी आवश्यक पदांची निश्चिती आणि ती भरण्यासाठी मान्यता मिळणे आवश्यक होते. आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या मागणीनुसार राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने भारतीय आयुर्विज्ञान परिषदेच्या मानांकानुसार विविध संवर्गातील ५१० पदे निर्माण करण्यास तसेच पदनिर्मिती, यंत्रसामग्री, उपकरणे, आवर्ती खर्च, बाह्यस्त्रोत खर्च व नव्याने अनुषंगिक शैक्षणिक रुग्णालय निर्मितीसाठी येणाऱ्या खर्चास निधी उपलब्ध करून देण्यास मान्यता दिली आहे.
शासनाच्या या निर्णयामुळे सातारा वैद्यकीय महाविद्यालयासाठी १ अधिष्ठाता, ५ प्राध्यापक, १४ सहयोगी प्राध्यापक, १ मुख्य प्रशासकीय अधिकारी, १८ सहायक प्रशासकीय अधिकारी, ग्रांथपाल आदी आवश्यक सर्व प्रकारची एकूण ५१० पदे भरण्यास मान्यता मिळाली आहे. जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी वैद्यकीय शिक्षणाची कवाडे खुली करून सातारा जिल्हावासियांचा जिव्हाळ्याचा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी ना. पवार यांचे जिल्ह्यातील जनतेच्या वतीने आभार मानले आहेत.
एका पाठोपाठ एक विकासकामांचा धडाका
आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या पाठपुराव्यामुळे कास धरण उंची वाढवण्याचा प्रश्न मार्गी लागला आणि सातारकरांचा पाणीप्रश्न कायमचा सुटला. हद्दवाढीला मंजुरी मिळवून आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी सातारा शहरासह त्रिशंकू भागालाही विकासाच्या प्रवाहात आणले. बहुचर्चित मेडिकल कॉलेजचाही प्रश्न पूर्णतः मार्गी लावून आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी जिल्हावासियांचा जिव्हाळ्याचा प्रश्न सोडवला. एकापाठोपाठ एक अशी विकासकामे मार्गी लावून आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी विकसकामांचा धडाका सुरु ठेला आहे. आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या धडाकेबाज लोकाभिमुख कार्यपद्धतीबाबत सातारकर आणि जिल्हावासीय समाधान व्यक्त करत आहेत.