
दैनिक स्थैर्य | दि. २३ नोव्हेंबर २०२३ | सातारा |
वंचित, दुर्लक्षित तसेच पौष्टिक तृणधान्य पिकांच्या क्षेत्रात, उत्पादनात आणि तंत्रज्ञानात वाढ होण्याची आवश्यकता विचारात घेऊन तसेच जास्तीत जास्त शेतकरी पीक स्पर्धेमध्ये सहभागी होतील, या दृष्टीकोनातून रब्बी हंगाम २०२३ पासून पीक स्पर्धा तालुका, जिल्हा व राज्य पातळीवर रबिवण्यात येणार आहे. त्यानुसार कृषि विभागाच्या सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी ज्वारी, गहू, हरभरा, करडई व जवस या ५ पिकांसाठी स्पर्धचे आयोजन करण्यात येणार असून शेतकर्यांनी ३१ डिसेंबरपर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी भाग्यश्री फरांदे यांनी केले आहे.
पीक स्पर्धेतील पिके : रब्बी पिके ज्वारी, गहू, हरभरा, करडई व जवस (एकूण ५ पिके)
पात्रता निकष : स्पर्धेत भाग घेण्यासाठी शेतकर्याकडे स्वतःच्या नावे जमीन असणे व ती जमीन तो स्वत: कसत असणे आवश्यक आहे. स्पर्धेत भाग घेणार्या शेतकर्याला एकाच वेळी एकापेक्षा जास्त पिकांसाठी स्पर्धेत सहभाग घेता येईल. पीक स्पर्धेमध्ये सहभागी लाभार्थीच्या स्वत:च्या शेतावर त्या पिकाखाली किमान ४० आर क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे.
अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे : विहित नमुन्यातील अर्ज (प्रपत्र-अ), ठरवून दिलेले प्रवेश शुल्क भरल्याचे चलन, ७/१२, ८-अ चा उतारा, जात प्रमाणपत्र (केवळ आदिवासी असल्यास), पीक स्पर्धेसाठी शेतकर्याने संबंधित ७/१२ वरील घोषित केलेल्या क्षेत्राचा चिन्हांकित केलेला नकाशा, बँक खाते चेक/पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत.
अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख : रब्बी हंगामामध्ये पीक स्पर्धेची अर्ज दाखल करण्याची तारीख खालील प्रमाणे राहील. ज्वारी, गहू, हरभरा, करडई व जवस – अंतिम तारीख ३१ डिसेंबर २०२३. अर्ज दाखल करण्याच्या तारखेच्या दिवशी शासकीय सुट्टी असल्यास त्यापुढील शासकीय सुट्टी नसलेली तारीख गृहीत धरण्यात यावी. तालुका स्तरावर, जिल्हा स्तरावर व राज्य स्तरावरील पीक स्पर्धा निकाल प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांकाचे पीक स्पर्धा विजेते निवडण्यात येतील.
स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क : पीकनिहाय सर्वसाधारण गटासाठी रक्कम रू. ३००/- राहील व आदिवासी गटासाठी रक्कम रू १५०/- राहील.
दुय्यम तसेच पौष्टिक तृण धान्य पिकांच्या क्षेत्रात आणि उत्पादनात वाढ व्हावी याकरिता जास्तीत जास्त शेतकर्यांनी पीक स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन कृषि विभागामार्फत करण्यात येत आहे.
पीक स्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी शेतकर्यांनी संबंधित तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा महाराष्ट्र शासन कृषी विभागाचे संकेतस्थळ www.krishi.maharashtra.gov.in ला भेट द्यावी. तसेच ब्लॉग स्पॉट लिंक https:// navnathkolapkar.blogspot.com/2019/11/blog-post_75.html?m=1 स्कॅन करावी, असेही जिल्हा अधिक्षक श्रीमती फरांदे यांनी सांगितले आहे.