दैनिक स्थैर्य | दि. २१ ऑक्टोबर २०२१ | सातारा | जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या दुसऱ्याच दिवशी जिल्हा परिषदचे सदस्य दीपक पवार यांनी प्राथमिक कृषी पथपुरवठा विकास सेवा सोसायटी संस्था जावलीमधून दोन अर्ज दाखल केले आहेत. इतर दोन जणांनीही आज अर्ज भरले असून, बुधवारी 3 वाजेपर्यंत 165 अर्जाची विक्री झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी मनोहर माळी यांनी दिली.
बुधवारी जावली मतदार संघातून दीपक साहेबराव पवार यांनी दोन अर्ज दाखल केले आहेत. त्यांना सुचक म्हणून अशोक साळुंखे तर अनुमोदक म्हणून मयुर जाधव हे आहेत. तसेच इतर मागासवर्गीय सदस्य या प्रवर्गांतून शंकर माळवदे यांनी आपला अर्ज दाखल केला आहे. त्यांना सुचक प्रभाकर फडणवीस आणि अनुमोदक अरविंद कुलकर्णी हे आहेत. त्यांच्या दुसऱ्या अर्जाला प्रेमचंद साबळे हे सुचक तर बारसिंग निवृत्ती हे अनुमोदक आहेत. विमुक्त जाती, भटक्या जमाती किंवा विशेष मागासवर्गीय प्रवर्गातून सुनील वाघ यांनी आपला अर्ज दाखल केला आहे. त्यांना वसंत धोत्रे हे सुचक तर राहुल वाघ हे अनुमोदक आहेत. तसेच औद्योगिक विणकर व मजूर संस्था या मतदार संघातूनही सुनील वाघ यांनी अर्ज भरला असून, त्यास राहुल वाघ हे सुचक तर वसंत धोत्रे हे अनुमोदक आहेत.