हरभरा पिकावरील घाटेअळीचा प्रादुर्भाव रोकण्यासाठी शेतकऱ्यांना आवाहन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १६ डिसेंबर २०२२ । पुणे । ढगाळ वातावरणामुळे हरभरा पिकावरील घाटेअळीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. घाटेअळीचा प्रादुर्भाव रोकण्यासाठी शेतकऱ्यांनी वेळीच उपाय योजना कराव्यात, असे आवाहन कृषि सह संचालक (विस्तार व प्रशिक्षण) पुणे डॉ. तुकाराम मोटे यांनी केले आहे.

सध्या आढळणारी कीड ही अंडी अवस्था व प्रथम अवस्थेतील अळी असल्यामुळे शेतकऱ्यांनी वेळीच उपाय योजना केल्यास कमी खर्चात किडींचे नियंत्रण होऊ शकते. बऱ्याच ठिकाणी अळीने प्रादुर्भाव करण्यास सुरुवात केली असून ही कीड बहुभक्षी असून विशेषतः पिक फुलोरा आणि प्रामुख्याने घाटे अवस्थेत नुकसानकारक असते.

शेतकऱ्यांनी शेताची कोळपणी किंवा निंदणी करून पिक तणविरहित ठेवून घाटेअळीच्या मोठ्या अळ्या हाताने वेचून त्यांना नष्ट कराव्यात. घाटेअळीच्या सर्वेक्षणासाठी हेक्टरी ५ कामगंध सापळे जमिनीपासून १ मिटर उंचीवर लावावेत. कामगंध सापळयामध्ये पतंग आढळल्यास किटकनाशकाची फवारणी करावी.

शेतामध्ये पक्षी बसण्यासाठी पिकाच्या किमान एक ते दोन फूट उंचीवर हेक्टरी ५० ते ६० ठिकाणी पक्षी थांबे उभारावेत. पिक कळी अवस्थेत असतांना ५ टक्के निंबोळी अर्काची किंवा अझेंडिरेक्टिन ३०० पीपीम ५ मिली प्रति लिटर पाण्यातून फवारणी करावी. घाटेअळी लहान अवस्थेत असताना एच.ए.एन.पी. व्ही. ५०० एल. ई. १ मिली प्रति लिटर पाण्यात ५ ग्रॅम निळ टाकून संध्याकाळच्या वेळेला फवारणी करावी.

किडींचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीच्यावर आढळून आल्यास इमामेक्टीन बेन्झोएट ५, एसजी ४.४ ग्रॅम किंवा फ्ल्युबेन्डामाईड ३९.३५ एससी २ मिली किंवा क्लोरॅनट्रीनीलीप्रोल १८.५ एससी २५ मिली यापैकी एका कीटकनाशकाची प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

कीटकनाशकांचे प्रमाण नॅपसॅक पंपासाठी असून पेट्रोल पंपासाठी मात्रा तीनपट वापरावी. शेतात किटकनाशकांचा वापर करतांना हातमोजे व तोंडावर मास्कचा वापर करावा व सुरक्षिततेची योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहनही कृषि विभागातर्फे करण्यात आले आहे.


Back to top button
Don`t copy text!