दैनिक स्थैर्य । दि. २५ जून २०२२ । मुंबई । महाराष्ट्र शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभागाकडून ” धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थीबहूल शासनमान्य खाजगी अनुदानित, विनाअनुदानित, कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नगरपालिका शाळा व अपंग शाळामध्ये पायाभूत सोयीसुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजना ” सन 2022-23 मध्ये राबविण्यात येत आहे. या योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन मुंबई शहरचे जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांनी केले आहे.
सन 2022-23 या वर्षासाठी अनुदान मिळवू इच्छिणाऱ्या अल्पसंख्याकबहुल शासनमान्य खाजगी शाळा, अपंग शाळा, नगरपालिका, नगरपरिषद शाळा व औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांनी विहित अटी व शर्तींची पुर्तता करुन सन 2022-23 या आर्थिक वर्षाकरिता विहित नमुन्यातील अर्जासह परिपुर्ण प्रस्ताव, जिल्हाधिकारी, मुंबई शहर, जुने जकात घर, शहीद भगतसिंग मार्ग, फोर्ट, मुंबई 400 001 यांच्याकडे सादर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
अर्जाचा विहित नमुना तसेच याबाबतचा अधिक तपशील महाराष्ट्र शासन निर्णय क्र. अविवि-2015/प्र.क्र.80/15/का.6,दि.07.10.2015 मध्ये व महाराष्ट्र शासनाच्या https://mdd.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे .
सन 2022-23 या आर्थिक वर्षासाठी या योजनेंतर्गत कालबद्ध कार्यक्रम राबविण्यात येत आहे. शाळांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव सादर करण्याचा अंतिम दिनांक 31 जुलै, 2022 राहील. यानंतर प्राप्त होणारे प्रस्ताव स्विकारले जाणार नाहीत. जिल्हाधिकारी कार्यालयाने प्राप्त प्रस्तावांची छाननी करुन त्रुटींची पुर्तता करुन अंतिमरित्या पात्र प्रस्ताव शासनास सादर करण्याचा अंतिम दिनांक 31 ऑक्टोबर, 2022 राहील याची संबंधितांनी नोंद घेण्यात यावी, असे जिल्हाधिकारी, मुंबई शहर यांनी सांगितले.