स्थैर्य, फलटण, दि. २९: जावली ता. फलटण येथील जावली विकास सोसायटीचे चेअरमन आप्पासाहेब यशवंत गोफणे (वय ७२) यांचे आज पुणे येथील रूग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या जाण्याने सहकार, राजकीय क्षेत्रातील एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व हरवले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले,दोन विवाहित मुली, सुना ,नातवंडे असा परिवार आहे.
आप्पासाहेब गोफणे हे माजी आमदार स्व. चिमणराव कदम यांचे अत्यंत विश्वासू सहकारी होते. त्यांनी 1972 ते 2000 या कालावधीत जावली ग्रामपंचायतचे सदस्य म्हणून अत्यंत प्रभावीपणे काम पाहिले असुन जावली गावच्या विकासात त्यांचे खुप मोठे योगदान होते. याबरोबरच जावली विकास सोसायटीचे चेअरमन म्हणून गेली बारा वर्षे ते कार्यरत होते यामध्ये सभासद हिताला प्राधान्य देत सोसायटी अत्यंत प्रभावीपणे मोठी करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा राहिला आहे.
तसेच अखंड हरिणाम सप्ताह कमिटी जावली चे अध्यक्ष म्हणून गेली तीस वर्षापेक्षा अधिक काळ ते काम पाहत होते यामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करत भाविकांची सेवा करण्याचे काम त्यांनी केले. गेली सहा वर्षेपेक्षा अधिक काळ दर आमावस्येला जावली व शिंगणापूर येथे जात असलेल्या भक्तांना लोकवर्गणीतुन महाप्रसाद गोफणे आण्णा यांनी सुरू केला होता. बचतगटाच्या माध्यमातून डाळमिल कंपनी त्यांनी सुरू केली होती. दुर्गादेवी, गणेशोत्सव मंडळाचे मार्गदर्शक म्हणूनही ते होते. महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री महादेवराव जाणकर यांचे ते अत्यंत विश्वासू सहकारी होते.
नमस्ते फलटणचे उपसंपादक पत्रकार राजकुमार गोफणे यांचे ते वडील होते. आप्पासो गोफणे यांच्या निधनाने जावली गावासह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.