
स्थैर्य, फलटण, दि. ३१ ऑगस्ट : फलटण शहरातील आरोग्य आणि तंदुरुस्तीचा उत्सव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘आपली फलटण मॅरेथॉन’ची घोषणा करण्यात आली आहे. जोशी हॉस्पिटल प्रा. लि. यांच्या वतीने आयोजित केली जाणारी ही मॅरेथॉन यंदा रविवार, दि. १२ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ५:३० वाजता सजाई गार्डन मंगल कार्यालय येथून सुरू होणार आहे. ‘अवयवदानला प्रोत्साहन’ ही यावर्षीची मुख्य संकल्पना असून, देशातील पहिल्या महिला पोलीस आयुक्त श्रीमती मीरा बोरवणकर या मॅरेथॉनच्या ब्रँड ॲम्बेसेडर असणार आहेत, अशी माहिती आयोजक डॉ. प्रसाद जोशी यांनी दिली.
डॉ. प्रसाद जोशी यांनी सांगितले की, “ही मॅरेथॉन केवळ एक स्पर्धा नसून, १२ ते ८५ वर्षे वयोगटातील सर्वांना व्यायामाचे महत्त्व पटवून देणारा एक आरोग्य मेळावा आहे.” यावर्षी मॅरेथॉनमध्ये २१ किमी हा नवीन प्रकार समाविष्ट करण्यात आला आहे. तसेच, भारतात प्रथमच रोबोटिक गुडघा आणि खुबा सांधेरोपण शस्त्रक्रिया झालेल्या १००० हून अधिक रुग्णांसाठी ३ किमीची विशेष ‘वॉकेथॉन’ आयोजित केली जाणार आहे.
मॅरेथॉनमधील विविध गट:
- मुख्य स्पर्धा (२१ किमी, १० किमी, ५ किमी): १८ ते ३० वर्षे (जोशपूर्ण युवा), ३१ ते ४५ वर्षे (सळसळती तरुणाई) आणि ४६ ते ६४ वर्षे (प्रगल्भ प्रौढ) या तीन वयोगटांसाठी.
- विशेष वॉकेथॉन (३ किमी): सांधेरोपण शस्त्रक्रिया झालेले रुग्ण आणि ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी.
- फन रन (३ किमी): लहान मुला-मुलींसाठी.
आकर्षक बक्षिसे आणि नोंदणी: मुख्य स्पर्धेतील प्रत्येक वयोगटासाठी पुरुष आणि महिलांकरिता स्वतंत्र बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.
- पहिले बक्षीस: १०,००० रुपये
- दुसरे बक्षीस: ७,००० रुपये
- तिसरे बक्षीस: ५,००० रुपये
मॅरेथॉनसाठी नोंदणी सुरू झाली असून, अंतिम तारीख २० सप्टेंबर २०२५ आहे. नोंदणी शुल्क पुरुषांसाठी ७५० रु., महिलांसाठी ५०० रु. आणि मुलांसाठी (१२-१८ वर्षे) ३०० रु. आहे. ६५ वर्षांवरील ज्येष्ठांसाठी ३ किमी वॉकेथॉनमध्ये प्रवेश विनामूल्य आहे. नोंदणीसाठी https://alpharacingsolution.com/e/apli-phaltan-marathon-2025 या लिंकचा वापर करता येईल. सहभागी प्रत्येक स्पर्धकाला आकर्षक टी-शर्ट, मेडल आणि ई-प्रमाणपत्र दिले जाणार आहे.