स्थैर्य, मुंबई, दि.१४: अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटपटू विराट कोहली यांनी मीडिया फोटोग्राफर्सना एक नोट लिहित विनंती केली आहे. या नोटमध्ये त्यांनी त्यांच्या मुलीचे फोटो फोटोग्राफर्सने काढू नयेत असे म्हटले होते. आपल्या मुलीचा फोटो मीडियात येऊ नये, अशी या दोघांची इच्छा आहे.
11 जानेवारी रोजी दुपारी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात अनुष्काने मुलीला जन्म दिला. त्यानंतर विराटने सोशल मीडियाच्या माध्यमातून ही आनंदाची बातमी शेअर करत मीडियाने आमच्या प्रायव्हसीचा आदर करावा, असे म्हटले होते. यानंतर आता दोघांनीही ऑफिशियल स्टेटमेंट जारी केले आहे.
मुलीशी संबंधीत कोणतीही माहिती देऊ नका
‘आई-वडील म्हणून आम्ही तुम्हाला विनंती करतो. आमच्या मुलीचे कोणीही फोटो काढू नयेत. कृपया आम्हाला सहकार्य करा’ असे त्यांनी म्हटले आहे. पुढे नोटमध्ये विराट आणि अनुष्काने योग्य वेळ येताच मुलीचे फोटो शेअर करु असे म्हटले आहे. ‘तुम्हाला हवी असलेली माहिती आम्ही तुम्हाला नक्की देऊ. पण आमच्या मुलीशी संबंधीत कोणतीही माहिती देऊ नका. आम्हाला माहित आहे की, तुम्ही समजू शकतात आणि याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत’, असे त्यांनी म्हटले आहे.
सोशल मीडियावर फेक फोटो होतोय व्हायरल
सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे. पोस्टमध्ये जो फोटो व्हायरल होतोय, तो अनुष्का आणि तिच्या नवजात बाळाचा असल्याचे म्हटले जात आहे. मात्र हा फोटो कॅची न्यूज वर्ल्ड नावाच्या वेबसाइटवर असून तो फेक फोटो आहे. हा फोटो 11 जानेवारीला वेबसाइटवर प्रसिद्ध झाला होता. हाच फोटो आणखी एका वेबसाइटवर असून तो 9 जुलै 2018 रोजी प्रकाशित झाला होता. त्यामुळे सोशल मीडियावर केलेला दावा खोटा असल्याचे स्पष्ट झाले आहे. अनुष्का आणि विराटने आपल्या बाळाचा एकही फोटो शेअर केलेला नाही.
विराटने रुग्णालयातील सुरक्षा वाढवली
सोबतच अनुष्काची ज्या हॉस्पिटलमध्ये डिलिव्हरी झाली, त्या मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये कर्मचार्यांना बाळाचे फोटो न काढण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. इस्पितळातील सुरक्षा देखील आधीपेक्षा अधिक कडक करण्यात आली आहे. जे लोक आजूबाजूच्या रूम्समध्ये दाखल आहेत त्यांना भेटायला येणाऱ्यांना आणि इतर कर्मचाऱ्यांना मुलीची झलक दिसू नये याची खास सोय करण्यात आली आहे. इस्पितळाच्या बाहेर छायाचित्रकारांची असलेली गर्दी पाहून अनुष्का आणि मुलीला मागच्या दाराने घरी पाठवण्याचा विचार केला जात असल्याचेही म्हटले जात आहे.