वाठार बुद्रुक खून प्रकरणातील दुसरा संशयित जेरबंद, लोणंद पोलीसांची कामगिरी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा, दि.१४: येरवडा कारागृहात झालेल्या वादाच्या कारणावरून जामिनावर सुटल्यानंतर वाठार बुद्रुक, ता. खंडाळा गावच्या हद्दीत एकाचा खून करून त्याचा मृतदेह नीरा उजवा कॅनॉलमध्ये टाकल्याप्रकरणातील दुसरा संशयित ऋषिकेश दत्तात्रय पायगुडे (रा. कुडजे, ता. हवेली, जि. पुणे) याला नाशिक येथून जेरबंद करण्यात लोणंद पोलिसांना यश मिळाले.

अकस्मात मृत्यू म्हणून नोंद झालेल्या गुन्ह्याचा कौशल्यपूर्ण रीतीने केलेल्या तपासातून लोणंद पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विशाल वायकर यांनी क्लिष्ट स्वरूपाच्या खुनाचा उलगडा करत यातील रेकॉर्डवरील व अन्य गुन्ह्याची शिक्षा भोगत असताना जमीनावर सुटून खून करण्याची मजल मारणार्‍या दोन संशयिताच्या मुसक्या अवळन्याची कामगिरी केली आहे. यातील वैभव सुभाष जगताप (वय 28 रा. पांगारे ता . पुरंदर , जि. पुणे) याला दोन दिवसापूर्वीच जेरबंद करण्यात यश आले होते.

दि. 8 जून रोजी मंगेश सुरेश पोमन (वय 35 रा.पोमन नगर पिंपळे, ता. पुरंदर याचा खून करून मृतदेह कॅनॉलमध्ये फेकून देऊन पुरावा नाहीसा केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी लोणंद पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला होता. तपास सुरू असताना लोणंद गुन्हे प्रकटीकरण शाखेने तांत्रिक विश्‍लेषणाच्या आधारे संशयितांची नावे निष्पन्न करून त्यापैकी वैभव सुभाष जगताप याला शिताफीने अटक केली. त्याच्याकडे चौकशी केली असता मंगेश पोमन, वैभव जगताप आणि ऋषिकेश पायगुडे हे तिघे येरवडा येथील कारागृहात शिक्षा भोगत असताना त्यांच्यात वाद झाला होता. हे तिघेही जामिनावर सुटल्यानंतर मंगेश पोमण याचा दोघांनी खून केल्याची कबुली वैभव जगताप याने दिली आहे. दुसरा संशयित ऋषिकेश पायगुडे याचा पोलीस तपास घेत होते. त्याला नाशिकमधून जेरबंद करण्यात लोणंद पोलीस ठाण्याच्या पथकाला यश आले असून पथक त्याला घेऊन सातार्‍याकडे रवाना झाले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्याला उद्या न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.


Back to top button
Don`t copy text!