शेटफळे गावात आणखी एक पुढचं पाऊल


दैनिक स्थैर्य । दि. २५ ऑक्टोबर २०२२ । मुंबई । यत्र नार्यस्तु पूजन्ते,रमन्ते तत्र देवता.अर्थात जिथे नारीची पूजा केली जाते, म्हणजेच स्त्रीचा सन्मान केला जातो. तिथे देवता रमतात,वास करतात. एका बाजूनं स्त्रीला असं देवता मानायचं,तर दुसऱ्या बाजूनं तिला एखाद्या मासळी प्रमाणे अमाणूस प्रथेच्या जाळ्यात जखडून टाकायचं,तडफडू द्यायचं. विधवा प्रथा त्यापैकीच एक. प्राचीन काळापासून आत्तापर्यंतचा स्त्री जातीचा इतिहास बारकाईनं अभ्यासला तर असे दिसून येते की.. सुरुवातीला मातृसत्ताक कुटुंब पद्धतीत स्त्रिला मानसन्मान मिळत होताच. तिच्याशिवाय कुटुंबातलं पानही हालत नव्हतं असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. नंतर पुरुषप्रधान संस्कृतीत स्त्रीवर अनेक बंधने आली. त्यापैकीच एक निर्बंध विधवा प्रथा.

आपण असा साधा सरळ विचार करूया.एखाद्या स्त्रीचा पती मरतो, खरं तर मरण नैसर्गिक आहे.आणि कोण कधी मरेल हे निश्चित सांगता येत नाही. मग मला सांगा पतीच्या मृत्युत पत्नीचा काय दोष? पत्नीच्या निधनानंतर पतीला विधूर म्हणून हिनवल्याचं अलीकडच्या काळात तरी कुठं दिसत नाही. मग ‘स्त्री’लाच विधवा म्हणून का हिनवायचं? पत्नी निधनानंतर पुरुषानं दुसरं लग्न करावं. झालंच तर.. तिसरं करावं. त्यानं सुखानं, ऐषरामात राहावं. मानसन्मानानं जगावं. मग स्त्रीवरच एवढी बंधनं कशाकरता? नवरा मेल्यानंतर ऐन तारुण्यात चुलीतील लाकडासारखं तिनं जळावं. अशी समाजाची अपेक्षा का असावी? तेही वाळलेल्या लाकडासारखं नाही.ओल्या लाकडासारखं.धुपत,खूपत रोज आतून-बाहेरून जळायचं. अगदी शेवटच्या श्वासापर्यंत अपमान गिळत जगायचं? आतल्या आत रोजच्या रोज मरायचं.
एकदा आपल्या हृदयावर हात ठेवून मनापासून सांगा.. नवरा मेल्यावर खरंच ‘स्त्री’च्या नारीसुलभ भावना मरतात का हो? तिच्या भावना पतीच्या चितेत जळून खाक होतात ? या प्रश्नाचं कोणत्याही संवेदनशील व्यक्तीचं उत्तर आजच्या घडीला नकारार्थीच असेल,असं मला वाटतं. कारण मानवी संवेदना एके काळी बोथट झाली असली तरी पूर्णतः बोथरी झालेली नाही. तरीही तिच्या वाट्याला एक प्रथा (ती ही बुरसटलेली) म्हणून हे असे असह्य जीवन का? कशासाठी?

असे प्रश्न प्रथम विधवा महिला विकास प्रतिष्ठानच्या संस्थापक-अध्यक्षा लतादेवी बोराडेंना पडले. का पडू नयेत? ऐन तारुण्यात वयाच्या १९ व्या वर्षी लग्न झाल्यावर.. लग्नानंतर फक्त २५ व्या दिवशी वैधव्य आलेल्या कोणत्याही सुज्ञ ‘स्त्री’ला असे प्रश्न पडल्याशिवाय राहणार नाहीत. आपल्या वाट्याला जे पांढऱ्या कपाळाचं, सांधीला पडलेल्या फुटक्या खापरासारखं जगणं आलं, ते इतर कुणा दुर्दैवी बहिणीच्या वाट्याला येऊ नये म्हणून लताताईंची ही क्रांतीकारी वाटचाल चालू आहे.   शेटफळे गावात विधवांना मानसन्मान मिळवून देणारी ही क्रांतीज्योत या लताताई नावाच्या क्रांतीज्योतीनं पेटवली आहे. त्यासाठी ग्रामपंचायतीने घेतलेला ठराव लाखमोलाचा ठरला. गावातील विधवासह इतर महिला, शेटफळे ग्रामपंचायत व गावातील सर्व सूज्ञ लोक ज्योतीने ज्योत लावण्यासाठी सहकार्य करत आहेत. अजून पूर्ण उजेड नसला तरी उजाडायला सुरुवात झाली आहे, हे मात्र नक्की. या क्रांतिज्योतीच्या प्रत्येक ज्वाळेत विधवा प्रथेला जाळून मुठमाती देण्याची धमक आहे. गावातील प्रत्येक विधवा किंबहुना जिनं आज हे सौभाग्याचं लेणं स्वीकारलं. ती प्रत्येक महिला एक एक क्रांतिज्योतीच आहे. ही ज्योत आता विझता कामा नये. ती विझू नये ही जबाबदारी जशी त्या सक्षम महिलेची,तशी आम्हा सुज्ञ गावकऱ्यांचीही.

सौभाग्याचं वाण.. एक प्रकारचं आव्हानच रेखा पाटील, वंदना देवकर, निशा गायकवाड, शितल गायकवाड, सत्यभामा भोरे, सुषमा शिंदे, वनिता माने या सातजणींनी आज जाहीर कार्यक्रमात हिरव्या बांगड्या, मंगळसूत्र, हळदी-कुंकू, केसात गजरा, नाकात नथ, हाताला मेहंदी लावून आपण सक्षम महिला आहोत, किंबहुना विधवा या बुरसटलेल्या प्रथेला तिलांजली देत.. आपल्या जीवनातला नवा अध्याय लतादेवी आणि गावकऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली लिहिला. आता याच गावच्या नवदुर्गा. याच नवक्रांतिज्योती आहेत. आता ज्योतीने ज्योत पेटत राहील. आणि एक दिवस पुरोगामी विचाराचा गावात लख्ख प्रकाश पडेल, हे सूर्यप्रकाशाइतकंच खरं आहे.

कोणी म्हणेल.. सांगणं सोपं आहे, पण तसं वागणं, समाजानं स्वीकारणं अवघड आहे. हो मलाही पटतंय.. ही गोष्ट अवघड आहे. रस्ता अवघड,जोखमीचा आहे. म्हणून मार्गच काढायचा नाही का? मागच्या पिढीतल्या विधवांसारखं असंच रडत- खडत, कुढत.. कुजून मरायचं का? माझ्या बहिणींनो.. वहिनींनो, मला वाटतं उकिरंड्यावरच्या असल्या जगण्यापेक्षा..खडतर असेना का, मार्ग काढायलाच हवा. मानसन्मानं जगायला हवं.

काट्याकुट्यातन.. ढेकळातन रस्ता काढायचा आहे.आधी पायवाट करणाऱ्या तुम्हाला त्रास होईल, पण त्या पायवाटेचा एक दिवस हमरस्ता होईल,हायवे होईल. शेटफळे गावचा सामाजिक इतिहास या मूळ पायवाटेचे मानकरी म्हणून ‘लताताई’सह तुम्हा सात जणीची नोंद ठेवील.तुम्ही जे सोसलं, ते पुढच्या पिढीतील आपल्या अभागी बहिणींना सोसावं लागणार नाही. आणि त्यासाठी तुम्हाला पुढं व्हावं लागतय. हे तुमचं भाग्य समजा. हो भाग्यच!

आता रडायचं नाही. लढाईच. स्वतःच्या आणि विधवा बहिणींच्या मानसन्मानासाठी लढाईचं. जगायचं तर मानसन्मानंच जगायचं.
या कामी लताताई तुमच्याबरोबर आहेतच. शिवाय आपल्या गावची ग्रामपंचायत आपल्या पाठीशी ठामपणे उभी आहे. त्याचबरोबर सुज्ञ गावकरीही आपल्या पाठीशी आहेत.   आणखी गोष्ट जाता जाता सांगतो.. लताताई पहिल्या दिवशी या कामी गावात आल्या होत्या,त्यावेळी स्मारकातील बैठकीनंतर लताताई व सरपंच मॅडमसह आम्ही अनेकजण ध्येयदिशा पेरणी प्रतिष्ठानच्या ऑफिसमध्ये थोडीशी विस्ताराने चर्चा केली. नंतर प्रतिष्ठानचे जवळजवळ सर्वच सदस्य जे गावातील प्रतिष्ठित त्याचबरोबर बाहेरगावी कार्यरत असणारे उच्चपदस्थ अधिकारी या सर्वांशी या गाव पातळीवरच्या लोकचळवळी विषयी माझी चर्चाही झाली. सांगण्याचा हेतू त्या सर्व प्रतिष्ठित,उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचाही तुम्हाला पाठिंबा आहे.त्यामुळे आता तुम्ही एकटे नाही.आता तुम्हाला कोणीही नावं ठेवणार नाही.उलट तुम्हाला सन्मान देतील .त्यामुळं आता रोज कुंकू लावायचं.हिरव्या बांगड्या,मंगळसूत्र, जोडव्यासह मानसन्मानानं जगायचं.

‘जगा आणि जगू द्या.’ या उदात्त भावनेतून स्वतः आपल्यासाठी,आपल्या कुटुंबासाठी,आपल्या गावासाठी,मान सन्मानानं जगायचं.आणि मानसन्मानानं मरायचंही!.
जय हो.. मंगल हो!

–प्रा.संभाजीराव गायकवाड
(संस्थापक-अध्यक्ष,ध्येयदिशा पेरणी प्रतिष्ठान)


Back to top button
Don`t copy text!