स्थैर्य, न्यू ब्रून्स्विक, दि.१३: कोरोना महामारीला लढा देण्यासाठी जगभरात कित्येक लसींची निर्मिती करण्यात येत आहे. यामधील ब-याच लसी या चाचण्यांच्या विविध टप्प्यांमध्ये आहेत. जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीची लसही चाचणीच्या दुस-या टप्प्यामध्ये आहे. मात्र, आता ही लस देण्यात आलेले काही लोक आजारी पडत असल्याचे दिसून आल्यामुळे ही चाचणी थांबवण्यात आली आहे.
कंपनीने याबाबत माहिती दिली. मोठ्या प्रमाणात चाचण्या घेताना अशा प्रकारच्या घटना घडणे सर्वसाधारण बाब असल्याचे कंपनीने म्हटले आहे. तरीही, खबरदारी म्हणून पुढील सूचना मिळेपर्यंत लसीची चाचणी थांबवली असल्याचे कंपनीच्या अधिका-यांनी जाहीर केले. लस दिलेल्या स्वयंसेवकांना नेमका कोणता आजार होतो आहे, आणि तो कशामुळे झाला असावा याबाबत कंपनीतील वैज्ञानिक सध्या संशोधन करत आहेत. याव्यतिरिक्त या आजाराबाबत अधिक माहिती देण्यास कंपनीने नकार दिला.अशा प्रकारे कोरोना लसीची चाचणी थांबवण्याची ही दुसरी घटना आहे.
यापूर्वी लंडनच्या ऑक्सफर्ड विद्यापीठाने तयार केलेल्या लसीबाबतही असाच प्रकार समोर आला होता. मात्र काही काळानंतर या लसीच्या चाचणीच्या पुढील टप्प्यांना काही देशांमध्ये परवानगी मिळाली. अमेरिकेत मात्र अद्यापही या लसीच्या चाचणीला परवानगी देण्यात आली नाही.