
स्थैर्य, मुंबई, दि.५: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी प्रदेशाध्यक्षपद सोडण्याचा निर्णय घेतला असून राजीनामा देण्यासाठी ते दिल्लीत थांबून आहेत. काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी तीन नेत्यांची नावे चर्चेत आहेत.
थोरात यांनी दिल्लीत राजीव सातव, संघटन महासचिव के. सी. वेणुगोपाल, खजिनदार पवन बन्सल यांच्या भेटी घेतल्या. सोमवारी रात्रीपर्यंत त्यांची पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांच्याशी भेट झाली नव्हती. तसेच त्यांनी राजीनामा पक्षश्रेष्ठींकडे दिला नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
बाळासाहेब थोरात यांच्याकडे राज्याचे महसूल मंत्रिपद, काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेतेपद आणि प्रदेशाध्यक्षपद अशी तीन पदे आहेत. पूर्णवेळ प्रदेशाध्यक्ष हवा अशी काँग्रेसमधल्या एका गटाची मागणी आहे. तसेच थोरात यांच्या साैम्य स्वभावामुळे आघाडीत काँग्रेस कायम बॅकफूटवर राहत असल्याचा आरोप त्यांच्यावर होतो आहे.
४ महिन्यांपूर्वी कर्नाटकचे आमदार एच. के. पाटील हे राज्यात प्रभारी म्हणून आले. तसेच राज्यात पाच सहप्रभारी असून पाच प्रदेश कार्याध्यक्षसुद्धा आहेत. यामुळे पक्षातील गटबाजीला वैतागून थोरात यांनी स्वत:हून बाजूला होण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले जाते.
कोण आहे शर्यतीत?
१. विदर्भातून नितीन राऊत, नाना पटोले तर मराठवाड्यातून राजीव सातव व पश्चिम महाराष्ट्रातून पृथ्वीराज चव्हाण हे शर्यतीत.
२. शरद पवारांसमोर बार्गेनिंग करण्यासाठी तितक्याच तोलामोलाचा नेता असावा म्हणून अनुभवी नेत्याला काँग्रेस प्रदेशाध्यक्षपद देऊ शकते.
३. थोरात यांचा पक्षश्रेष्ठी राजीनामा स्वीकारणार नाहीत. त्याउलट थोरात यांच्याकडची एक जबाबदारी (विधिमंडळ नेतेपद) कमी केली जाईल, असे जाणकारांचे म्हणणे आहे.