स्थैर्य, सातारा दि. ५ : जातीयतेच्या मर्यादा ओलांडून केलेलं व्यापक लिखाण हे अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्याचे एक महत्वाचे वैशिष्ट्य आहे. अण्णा भाऊंच्या साहित्यात तत्कालीन प्रागतिक विचारांच्या राजकारणाची छबी देखील उमटलेली दिसते असे मत नवी दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे प्रा. डॉ. मिलिंद आव्हाड यांनी व्यक्त केले.
विद्रोही सांस्कृतिक चळवळ, महाराष्ट्रच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर कॉ. अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त फेसबुक पेजवर आयोजित व्याख्यानमालेच्या दुसऱ्या सत्रात ते बोलत होते. “जात,दास्यश्रम आणि कॉ. अण्णा भाऊ साठे यांचे लिखाण ” यावर त्यांनी विस्तृत मांडणी केली.
अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यातील नायक हे बंडखोर होते. ती एकप्रकारे अण्णा भाऊ साठे यांनी केलेली साहित्यातील नैतिक बंडखोरीच होती असेही मत त्यांनी व्यक्त केले. अण्णा भाऊंची जातीय प्रतिमा अधिक उजागर केल्यामुळे त्यांची वैचारिक प्रतिमा झाकली जात आहे. मात्र ती पुन्हा एकदा प्रकाशात आणण्याची गरज निर्माण झालेली आहे असे मत त्यांनी व्यक्त केले.
यावेळी प्रा. संजय साठे यांनी डॉ मिलिंद आव्हाड यांचा परिचय करून दिला. सूत्रसंचालन मयूर अरुणा जयवंत यांनी केले.