आमदार सचिन पाटलांच्याकडुन अण्णा बनसोडे यांना शुभेच्छा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । 26 मार्च 2025। फलटण । पिंपरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार अण्णा बनसोडे यांची महाराष्ट्र विधानसभेच्या उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. बुधवारी (२६ मार्च २०२५) सभागृहात विधानसभा अध्यक्षांकडून याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली. या निवडीनंतर फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सचिन पाटील यांनी अण्णा बनसोडे यांना पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले आणि त्यांच्या पुढील यशस्वी संसदीय कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या.

अण्णा बनसोडे यांचा राजकीय प्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे. ते मूळतः चिंचवड येथे पान टपरी चालवत होते. त्यांनी १९९७ आणि २००२ मध्ये सलग दोन वेळा नगरसेवक म्हणून काम केले आणि स्थायी समिती अध्यक्षपदही भूषवले. २००९ मध्ये त्यांनी पहिल्यांदा आमदार म्हणून निवड झाली. २०१४ च्या अपवाद वगळता, पिंपरी मतदारसंघाच्या निर्मितीपासून ते विधानसभेत प्रतिनिधित्व करत आहेत.

अण्णा बनसोडे हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर ते अजित पवार यांच्यासोबत राहिले.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपसोबत सत्ता स्थापन करताना आणि जुलै २०२३ मध्ये शिवसेना-भाजप सरकारमध्ये सहभागी होताना ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत ठाम राहिले.

पिंपरी-चिंचवड शहराला स्थापनेपासून मंत्रिपदाची प्रतीक्षा होती. आता विधानसभेचे उपाध्यक्षपद मिळाल्याने, शहराला मंत्री दर्जाचे पद मिळाले आहे. हे औद्योगिकदृष्ट्या महत्त्वाचे केंद्र असलेल्या शहराच्या राजकीय प्रभावाचे द्योतक आहे.

विधानसभा उपाध्यक्षपदासाठी महायुतीकडून केवळ अण्णा बनसोडे यांचाच अर्ज आला होता. मंगळवारी (२५ मार्च २०२५) अर्ज पडताळणीत तो वैध ठरला.

बुधवारी सभागृहात मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या नियुक्तीचा प्रस्ताव मांडला.


Back to top button
Don`t copy text!