सेवागिरी यात्रेनिमित्त पुसेगावात 23 डिसेंबरला जनावरांचे प्रदर्शन


स्थैर्य, सातारा, दि. 16 डिसेंबर : श्री सेवागिरीमहाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त जातिवंत खिलार जनावरांचे भव्य प्रदर्शन होणार आहे. यामध्ये 22 डिसेंबरला नोंद, 23 डिसेंबरला बक्षिसपात्र जनावरांची निवड व 24 डिसेंबरला बक्षीस समारंभआयोजित केला आहे. तरी राज्यातील खिलाप्रेमींनी या सुवर्णसंधीचा लाभघ्यावा, असे आवाहन देवस्थानचे मठाधिपती श्रीमहंत सुंदरगिरी महाराज आणि ट्रस्टचे अध्यक्ष संतोष वाघ यांनी केले आहे.

खिलारच्या उपजातीनुसार खिलार काजळी बैल गट, खिलार काजळी गाय गट, खिलार कोसा बैल गट, खिलार कोसा गाय गट या चार मुख्य गटांत ही स्पर्धा होणार आहे. प्रत्येक गटात जुळीक, सहा दाती, चार दाती, दोन दाती, आदत (वर्षांवरील), आदत (वर्षांखालील) असे वयोमानानुसार सहा उपगट तयार करण्यात आले आहेत. प्रत्येक उपगटात निवड झालेल्या प्रथम चार क्रमांकाच्या विजेत्या जनावरांच्या मालकांना अनुक्रमे 7 हजार, 5 हजार, 3 हजार, 2 हजार रुपये बक्षीस देण्यात येईल. चारही मुख्य गटातील चॅम्पियन जनावराच्या मालकाला प्रत्येकी 25 हजार रुपये व श्री सेवागिरी चषक देण्यात येणार आहे.

सातारा – पंढरपूर रोडवरील यात्रा स्थळावर हे प्रदर्शन पार पडेल. स्पर्धा फक्त खिलार जनावरांच्या होतील. पंचांचा निर्णय अंतिम राहील. एखाद्या गटातील क्रमांक विभागून दिल्यास बक्षिसाची रक्कम विभागून दिली जाईल. जनावराची नोंद करतेवेळी मालकाचे आधार कार्ड व त्याची झेरॉक्स प्रत सोबत असणे आवश्यक आहे. ऐनवेळी जनावरे कमी आली तर निवडीचे अधिकार संयोजन समितीकडे राहतील.प्रदर्शनाच्या यशस्वितेसाठी ट्रस्टचे अध्यक्ष संतोष वाघ, विश्वस्त डॉ. सुरेश जाधव, रणधीर जाधव, बाळासाहेब ऊर्फ संतोष जाधव, सचिन देशमुख, गौरव जाधव, सचिव विशाल माने विशेष परिश्रम घेत आहेत.


Back to top button
Don`t copy text!