
स्थैर्य, फलटण, दि. ६ ऑक्टोबर : फलटण नगरपरिषदेचे नगराध्यक्ष पद ‘सर्वसाधारण खुला’ प्रवर्गासाठी जाहीर होताच शहरातील राजकीय घडामोडींनी प्रचंड वेग घेतला आहे. राजे गटाकडून या पदासाठी अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीवर जवळपास शिक्कामोर्तब झाल्याचे मानले जात असून, एका व्हॉट्सॲप स्टेटसमुळे या चर्चेला मोठे बळ मिळाले आहे.
आरक्षण जाहीर झाल्यानंतर काही क्षणातच, फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांचा फोटो आपल्या व्हॉट्सॲप स्टेटसवर शेअर केला. या कृतीकडे राजे गटाकडून उमेदवारीचा दिलेला हा पहिलाच आणि स्पष्ट संकेत म्हणून पाहिले जात आहे.
त्यामुळे अध्यक्षपदाच्या उमेदवारीबाबत राजे गटातील चित्र आता स्पष्ट झाले असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
फलटण नगरपरिषदेचे अध्यक्षपद खुले झाल्याने ही निवडणूक अत्यंत चुरशीची होण्याची शक्यता आहे. राजे गटाकडून अनिकेतराजे यांचे नाव निश्चित मानले जात असताना, महायुतीकडून कोणाला उमेदवारी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.