दैनिक स्थैर्य | दि. 21 जानेवारी 2024 | फलटण | प्रसन्न रुद्रभटे | विधानपरिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे चिरंजीव श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर हे आगामी काळात फलटणच्या राजकारणात सक्रिय होणार असल्याच्या चर्चा फलटणच्या राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत.
गेल्या काही दिवसांपासून श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर हे फलटण तालुक्यातील जाहीर कार्यक्रमांना उपस्थिती दर्शवित आहेत तर खाजगी बैठका सुद्धा मोठ्या प्रमाणावर घेत आहेत. साखरवाडी येथे नेत्रतपासणी शिबिराचे उद्घाटन करायला अनिकेतराजे गेले होते. त्यावेळी त्यांनी काळज व पाडेगाव येथे सुद्धा काही खाजगी कामासाठी बैठका घेतल्याची चर्चा सुरू आहे.
आज श्रीमंत अनिकेतराजे यांच्या हस्ते सब ज्युनिअर मैदानी स्पर्धेचे उद्घाटन संपन्न झाले. त्यामुळे आता पुन्हा एकदा फलटणच्या राजकारणात श्रीमंत अनिकेतराजे रामराजे नाईक निंबाळकर हे सक्रिय होणार की राजकारणापासून चार हात लांब राहणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
या आधी नगरसेवकपद भूषविलेले श्रीमंत अनिकेतराजे तदनंतर राजकारणात फारसे रमले न्हवते, पण आता पुन्हा त्यांना राजकारणात सक्रिय केले जाईल, असा कयास अनेक जण लावत आहेत.
गेल्या काही वर्षांपासून ओबीसी आरक्षण मुळे नगरपरिषदेच्या निवडणुका ह्या प्रलंबित आहेत. आगामी लोकसभा व विधानसभा झाल्यानंतरच नगरपरिषदेच्या निवडणुका होतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे; त्यामुळे आगामी नगरपरिषदेच्या निवडणुकीत श्रीमंत अनिकेतराजे रामराजे नाईक निंबाळकर हे राजकारणात सक्रिय होणार आहेत का ? असा प्रश्न राजे गटाच्या अनेक कार्यकर्त्यांना पडला आहे.
श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी आपले राजकारणाची सुरवात ही फलटण नगरपरिषदेच्या माध्यमातून सुरू केली होती. त्यानंतर राजकारणात कधीही मागे वळून बघावे लागले नाही. नगराध्यक्ष, आमदार, राज्यमंत्री, कॅबिनेट मंत्री व नंतर विधानपरिषद सभापती असा चढता आलेख हा श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचा राहिला आहे. याचप्रमाणे श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर हे सुद्धा नगरपरिषदेच्या माध्यमातून फलटणच्या राजकारण व समाजकारणात सक्रिय होणार का ? या प्रश्नाचे उत्तर येणारा काळच देईल.
श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे राजकारणात सक्रिय झाल्यानंतर फलटण तालुक्यातील युवकांचे मोठे संघटन त्यांनी उभे केले आहे. अनेक युवकांच्या हाताला काम देण्याचे काम त्यांनी केले आहे. आता राज्यामध्ये सत्तेची गणिते बदलली आहेत. त्यामुळे श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचा वारसा सक्षमपणे पुढे चालवण्यासाठी अनिकेतराजे यांनी फलटणच्या राजकारणात सक्रिय होणे गरजेचे आहे. श्रीमंत अनिकेतराजे हे जर पूर्ण ताकदीने फलटणच्या राजकारणात उतरले तर राजे गटामधील युवा कार्यकर्त्यांच्यामध्ये चैतन्य निर्माण होईल; यात कसलीही शंका नाही.