आनेवाडी टोलनाका हस्तांतर आंदोलनप्रकरणी खा. उदयनराजे व अकरा समर्थक निर्दोष, वाई न्यायालयाचा निकाल

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, वाई, दि. २३: आनेवाडी (ता. वाई) टोल नाका येथील टोल हस्तांतर आंदोलन प्रकरणी खा. उदयनराजे व इतर अकरा समर्थकांची वाई न्यायालयाने आज निर्दोष मुक्तता केली.
आनेवाडी टोल नाका येथे दि. 5 ऑक्टोबर 2017 रोजी संध्याकाळी सहा वाजता खासदार उदयनराजे, अशोक सावंत, अजिंक्य मोहिते, मुरलीधर भोसले, सनी भोसले, सुजित आवळे, राजू गोडसे, किरण कुराडे, इम्तियाज बागवान, बाळासाहेब ढेकणे, विवेक उर्फ बंडा जाधव आदींनी जिल्हाधिकारी जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केले. आनेवाडी टोल नाका येथे अडीचशे जणांचा बेकायदेशीर जवळचा जमवून टोलनाक्यावरील स्थानिक कामगारांचा व दिवाळी बोनसचा मुद्दा व टोल वसुलीचा अधिकार कोणाला देणार नाही असे बोलून टोल हस्तांतरणास विरोध केला होता. यावेळी टोल नाक्यावर मोठा गोंधळ निर्माण झाला होता व तणावपूर्ण वातावरण झाले होते. यावेळी तेथे मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. याबाबत भुईंज पोलीस ठाण्यातील पोलीस कॉन्स्टेबल धनाजी तानाजी कदम यांनी पोलीस ठाण्यात बेकायदेशीर जमाव जमवून जिल्हाधिकारी आदेशाचा भंग केल्याची तक्रार दाखल केली होती. त्या अनुषंगाने न्यायालयात गुन्हा दाखल झाला होता. त्याची सुनावणी वाई येथील न्या एम. एन. गिरवलकर यांच्या न्यायालयात झाली. सुनावणी दरम्यान सहा साक्षीदार तपासण्यात आले. अंतिम सुनावणीनंतर खा. उदयनराजे व त्यांच्या अकरा सहकार्‍यांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. सुनावणीसाठी आज न्यायालयात खासदार उदयनराजे व त्यांचे सर्व सहकारी उपस्थित होते. सरकार पक्षाच्या वतीने मिलिंद पांडकर यांनी तर उदयनराजे व इतरांच्या वतीने अ‍ॅड. ताहेर मणेर यांनी काम पाहिले. खा. उदयनराजे यांची निर्दोष मुक्तता झाल्याचे समजल्यानंतर कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला.

Back to top button
Don`t copy text!