आंधळी धरण आतापर्यंत 11 वेळा भरले


दैनिक स्थैर्य । 28 मे 2025। सातारा । माणगंगा नदीवरील माण तालुक्यातील काही गावांची वरदायिनी असलेले आंधळी धरण आत्तापर्यंत 11 वेळा भरले आहे. यावेळी जोरदार पावसामुळे व जिहे-कठापूर योजनेच्या पाण्यामुळे ते मे मध्येच भरले आहे. धरणाचे पाणी सांडव्यावरुन वाहू लागले आहे. माणगंगा नदीच्या पात्रातील 26 बंधारे भरून ओसंडून वाहत आहेत. निसर्गान तालुक्यावर पहिल्यांदाच अशी कृपा केली आहे.

सन 1995 पूर्वी आंधळी धरण होताना अनेकांनी अडचणी निर्माण केल्या होत्या. परंतु 2000 साल उजाडता उजाडता युती शासनाच्या काळात निधी मिळाल्याने हे धरण पूर्ण झाले. तत्कालीन आमदार स्व. धोंडीराम वाघमारे यांनी युती शासनाच्या काळात पुढाकार घेतल्याने अनेक अडथळे पार करत धरण पूर्ण झाले. 8 ऑक्टोबर 2001 रोजी धरण पहिल्या वेळेस भरल्याचे सांगितले जाते. आंधळी धरणाची पाणी साठवण क्षमता 0.33 टी एम सी असून उपयुक्त पाणीसाठा 0.26 टी एम सी आहे. या धरणाची पाणी पातळी 10,560 मीटर असून, या धरणावरून 25 हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. पंचवीस वर्षात आंधळी धरण यावर्षी अकराव्या वेळेस भरले आहे.

यावर्षी हे धरण दि. 25 मे रोजी उन्हाळ्यातच पूर्ण क्षमतेने भरले. एवढेच नव्हे तर माणगंगा आता दुथडी भरुन वाहत आहे. त्यामुळे माणगंगा नदी वर बांधलेले 26 बंधारे भरले आहेत. यामुळे जवळपास 25 गावांचा पाण्याचा प्रश्न मिटणार आहे. या धरणावरुन अनेक गावांच्या पिण्याच्या पाण्याच्या तसेच शेतीच्या पाईपलाईन आहेत.
माण तालुक्यातील आंधळी धरण पूर्ण क्षमतेने भरले असून सांडव्यावरुन पाणी वाहू लागले आहे. माण तालुक्याच्या पश्चिमेकडील भागातही या तलावातून पाणी जाणार आहे. राणंद तलाव ही आंधळी धरणातून भरण्याचा नवीन प्रयोग यावर्षी झाला. त्यामुळे भविष्यात म्हसवड एमआयडीसी येथेही या धरणाचे पाणी जाईल. त्यामुळे या धरणाला विशेष महत्त्व आहे. जिहे कठापूर योजनेच्या पाणीही आंधळी धरणातच येत असल्याने धरणाचे महत्व वाढले आहे. धरणात मासेमारी व्यवसाय चालतो. निसर्गरम्य परिसर असल्याने भविष्यात या धरणात बोटिंग ची व्यवस्था झाल्यास हा परिसर मोठा पिकनिक स्पॉट होऊ शकतो. आंधळी धरण यापुढे तालुक्याच्या विकासाचा नवा आयाम ठरणार आहे.


Back to top button
Don`t copy text!