दैनिक स्थैर्य | दि. २२ सप्टेंबर २०२३ | फलटण | धुमाळवाडी, ता. फलटण येथे प्रांताधिकारी सचिन ढोले यांच्या हस्ते आनंदाचा शिधा वाटप करण्यात आले.
राज्यातील गोरगरीब जनतेला गौरी गणपती उत्सव आनंदाने साजरा करता यावा, यासाठी शासनाने आनंदाचा शिधा उपलब्ध करून दिला आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील पात्र लाभार्थींना गौरी गणपती उत्सवानिमित्त चार शिधाजीन्नस समाविष्ट असलेला संच अर्थात आनंदाचा शिधा फलटणचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांच्या हस्ते धुमाळवाडी येथील रास्त भाव दुकानातून वाटप करण्यात आले.
जिल्ह्यात गत आठवड्यात तीन दिवस इंटरनेट सुविधा बंद असल्याने आनंदाचा शिधा संच वितरणाला काहीसा विलंब झाला आहे.
सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेतील शिधापत्रिकांसाठी एक किलो रवा, एक किलो साखर, एक किलो चणाडाळ, एक लिटर पामतेल या चार शिधा जिन्नसांचा समावेश असलेला एक शिधाजींन्नस संच प्रति शिधापत्रिका धारकास रुपये शंभर या दराने वितरित करण्यात येत आहे.