अयोध्येचा राजा गणेश मंडळाचा आदर्श; सामाजिक उपक्रमांसह पर्यावरणपूरक उत्सव साजरा

'पदाधिकारी विरहित' मंडळाचे उपक्रम कौतुकास्पद - अनिलकुमार कदम


स्थैर्य, फलटण, दि. २९ ऑगस्ट : फलटण शहरातील गोळीबार मैदान, लक्ष्मी नगर येथील ‘अयोध्येचा राजा गणेशोत्सव मंडळ’ हे पर्यावरण रक्षण आणि सामाजिक प्रबोधनाचा संदेश देत उत्सव साजरा करत असल्याने एक आदर्श उदाहरण ठरत आहे. मंडळाने आयोजित केलेले विविध उपक्रम हे अत्यंत कौतुकास्पद आहेत, असे गौरवोद्गार मुक्त पत्रकार, लेखक तथा कवी श्री. अनिलकुमार कदम यांनी मंडळाला भेट दिली असता काढले.

या मंडळाच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त केवळ पारंपरिक पूजेपुरते मर्यादित न राहता पर्यावरण रक्षण, मनोरंजनात्मक खेळ, रांगोळी प्रदर्शन, चित्रकला, नृत्य, महिलांसाठी संगीत खुर्ची, भजन आणि महाप्रसाद यांसारख्या विविध सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. या सर्व उपक्रमांमध्ये लहान-थोर गणेशभक्त मोठ्या आनंदाने सहभागी होत आहेत.

मंडळाचे सदस्य श्री. पारस नांदले यांनी सांगितले की, “आम्ही ध्वनिप्रदूषण आणि वायुप्रदूषण होणार नाही, याची विशेष काळजी घेतो. तसेच, वर्गणीसाठी कोणावरही सक्ती केली जात नाही, हे आमच्या मंडळाचे वैशिष्ट्य आहे.”

या मंडळाची आणखी एक उल्लेखनीय बाब म्हणजे येथे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव असे कोणतेही पदाधिकारी नाहीत. सर्व सदस्य एकदिलाने आणि सामूहिक नियोजनातून उत्सवाचे कामकाज पाहतात. साईश वाळा, पारस नांदले, तेजस शिंदे, रोहित तरडे, चेतन बरळ, सौरभ बनकर, शुभंम नांदले, स्वप्निल पांडे आणि दिव्यांक गौंड यांच्यासह संपूर्ण टीमच्या एकत्रित प्रयत्नांतून हा उत्सव आनंददायी पद्धतीने साजरा केला जात आहे.


Back to top button
Don`t copy text!