सातारा पालिकेचा लौकिक घंटागाडीवरील गीतांमुळे नव्हे तर भ्रष्टाचारामुळे – नगरविकास आघाडीचे पक्षप्रतोद अमोल मोहितेंचा पलटवार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १४ जुलै २०२१ । सातारा । घंटा गाडयांवरील गीतामुळे निर्माण झालेल्या सातारा नगरपालिकेच्या अस्तित्वा पेक्षाही सातारा विकास आघाडीच्या काळातील भ्रष्टाचार आणि टक्केवारीच्या बजबजपूरीने बरबटलेल्या कारभाराचा गवगवा अधिक झाल्यानेच सातारा नगर पालिकेचे नाव सर्वदूर पोहचले आहे. कोविड प्रतिबंधीत लसीकरण कार्यक्रम अंमलबजावणीत काडीचे योगदान नसणारी सातारा विकास आघाडी ही निवडणूकीच्या तोंडावर केवळ पेपरबाजी करीत आहे. स्वच्छतेच्या नावाखाली अख्या नगरपालिकेच्या तिजोरीचाच सुफडासाफ करणार्‍या सातारा विकास आघाडीने स्वच्छतेच्या गप्पा मारणे म्हणजे ‘करून करून भागले’ असाच प्रकार असल्याचा टोला नगर विकास आघाडीचे पक्ष प्रतोद व नगरसेवक अमोल मोहिते यांनी लगावला आहे.

सातार्‍यात आता हंडे मोर्चे का निघत नाहीत, याची पार्श्‍वभूमी जाणून घेवून उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांनी अभ्यास करण्याची गरज आहे. स्. श्रीमंत छत्रपती अभयसिंहराजे भोसले तथा भाऊसाहेव महाराज यांच्या दूरदृष्टीमुळे सातारा शहराला नवसंजीवनी ठरलेली शहापूर पाणी पुरवठा योजना आकाराला आली. ही योजना खर्चीक असल्याची ओरड तुमच्या नेत्यांनी केली होती. या योजनेमुळेच सातारकरांचा पाणी पुरवठा सुरळीत झाला. हे मात्र तुम्ही सोईस्कररित्या विसरलात. नंतरच्या काळात आमचे नेते आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या शासन पातळीवरील सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आणि प्रयत्नामुळेच कास धरणाव्या उंची वाढीचा प्रश्‍न मार्गी लागला. कासच्या उंची वाढ प्रस्तावास मंजूरी मिळवून देण्याबरोबरच त्यानंतर रखडलेल्या कामांना निधी मिळवून देण्याचे कामही आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यामुळेच झाल्याने सातारकर नागरीकांच्यावर हंडे मोर्चे काढण्याची वेळ आली नाही.

खोटं आणि ते ही रेटून बोलण्यात माहीर असलेलेच सध्याच्या कोरोनाच्या साथीच्या काळात विलगीकरण केंद्र व लसीकरणाच्या कार्यकमाबाबत कसलेच योगदान नसताना जनतेची दिशाभूल करीत आहेत. विलगीकरण केंद्रासाठी शासनाच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाचे जिल्हाधिकारी व प्रांताधिकारी काम करीत आहेत. तर लसीकरण मोहीम राज्य व केंद्र शासनाच्या माध्यमातून जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग राबवित आहे. असे असतानाही आम्हीच सर्वकाही करतो अशा फुशारक्या मारणार्‍या व सातारा विकास आघाडीच्या मार्गदर्शनाखालील नगर पालिकेच्या आरोग्य विभागाने जंतूनाशकाबरोबरच कोविड बाधित मयतांच्या अंत्यसंस्कारासाठी कैलास स्मशानभूमीत रोवण्यात आलेल्या सरणाच्या लाकडात किती मलीदा लाटला हे प्रसिध्दी माध्यमांनीच जगजाहीर केले आहे. एकदाची त्या जंतुनाशकाची तपासणी करा म्हणजे कुणाकुणाच्या पोटात मलिद्याचे किडे शिरलेत हे ही जनते समोर येईल.
नगर पालिकेत मर्जीतल्या ठेकेदारांनाच काम मिळावे यासाठी चार चार वेळा निविदा काढून केलेला निविदा कामातील भ्रष्टाचार तसेच नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, सभापती यांच्यासह सातारा विकास आघाडीतील कोणाकोणाला किती टक्केवारी द्यावी लागते हे तुमचेच नगरसेवक वर्तमानपत्रातून जाहीररित्या आरोप करीत असतात. एकमेकांची उणीदुणी काढण्यात आघाडीवर असलेली सातारा विकास आघाडी असाच लौकिक तुम्ही मिळवला आहे. कोटयावधीच्या विकास कामांच्या बाता मारणार्‍यांनी हद्दवाढीत नव्याने समावेश झालेल्या भागासाठी किती निधी आणला हेही जाहीर करावे. भुयारी गटर योजनेतला बट्याबोळ, सोनगाव डेपोची दुरवस्था, घटांगाडीतला घपला आणि घंटागाडीवाल्याचा आत्महत्येचा प्रयत्न, सफाई कामगारांचे चार चार महिने रखडणारे पगार, प्रकाश योजने खालील बजेटचा भ्रष्टाचार, खुलेआम सुरू असलेले कमीशनराज आणि स्वच्छतेच्या नावाखाली नगरपालिकेच्याच तिजोरीची सुरू असलेली सफाई यातच गुरफटून समक्षतेचा डांगोरा पिटणा-यांनी विकासकामांच्या आणि नगरलिकेच्या सक्षमतेच्या वल्गना करू नये, असा टोलाही अमोल मोहिते यांनी लगावला आहे.


Back to top button
Don`t copy text!