
थेट WhatsApp वर मिळवा
बाजारातील रासायनिक जेलीऐवजी घरच्या घरी अवघ्या १० मिनिटांत बीट, गाजर आणि आवळ्यापासून पौष्टिक आणि चविष्ट जेली कशी बनवायची, याची सोपी कृती जाणून घ्या.
स्थैर्य, सातारा, दि. २३ नोव्हेंबर : लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच जेली खायला आवडते, मात्र बाजारात मिळणाऱ्या रसायनयुक्त जेलीमुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतात. दुसरीकडे कच्चे बीट, गाजर किंवा आवळा खाण्यास मुले नकार देतात. यावर उत्तम पर्याय म्हणून घरच्या घरी अवघ्या १० मिनिटांत बीट, गाजर आणि आवळ्यापासून चविष्ट आणि पौष्टिक गुलाबी जेली तयार करता येते.
जेली बनवण्यासाठी लागणारे साहित्य
या पौष्टिक जेलीसाठी बीट, गाजर, आवळा, साजूक तूप, भाजलेल्या जिऱ्याची पावडर, काळे मीठ, खडीसाखरेची पावडर आणि कॉर्नफ्लॉवर हे मोजके साहित्य लागते. बीटमुळे शरीर डिटॉक्स होण्यास मदत होते, तर आवळ्यामुळे केस आणि त्वचेला आवश्यक पोषण मिळते.
घरीच जेली तयार करण्याची सोपी कृती
सर्वप्रथम बीट, गाजर आणि आवळे स्वच्छ धुऊन वाफवून घ्यावेत व थंड झाल्यावर आवळ्याच्या बिया काढून सर्व साहित्य मिक्सरमधून बारीक वाटून घ्यावे. एका पॅनमध्ये तूप गरम करून ही पेस्ट मंद आचेवर परतून घ्यावी आणि त्यात जिरे पावडर, काळे मीठ व खडीसाखरेची पावडर मिसळावी. त्यानंतर कॉर्नफ्लॉवरची पेस्ट घालून मिश्रणाचा घट्ट गोळा होईपर्यंत शिजवावे आणि थंड झाल्यावर लहान गोळ्या करून खडीसाखरेच्या पावडरमध्ये घोळवून घ्यावे.



