दैनिक स्थैर्य । दि. ११ एप्रिल २०२३ । मुंबई । भाजप नेते तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीसंदर्भात पुन्हा एकदा मोठी भविष्यवाणी केली आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजप पुन्हा एकदा सत्तेवर येईल, असा दावा त्यांनी केला आहे. एवढेच नाही, तर जागांचा अंदाज वर्तवत, नरेंद्र मोदी किती जागां जिंकत तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार हेही त्यांनी यावेळी सांगितले.
अमित शाह आसाममधील दिब्रुगड येथे एका जाहीर सभेत बोलत होते. यावेळी त्यांनी काँग्रेससहराहुल गांधींवरही निशाणा साधला आणि यांचा लवकरच संपूर्ण देशातून सफाया होईल, असेही ते म्हणाले. यावेळी शाह यांनी आसाममधील दिब्रुगड येथील भाजप प्रदेश कार्यालयाची पायाभरणीही केली.
शाह म्हणाले “मी काँग्रेसला सांगू इच्छितो की, 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजप आसाममध्ये 14 पैकी 12 जागांवर विजय मिळवेल आणि मोदी 300 हून अधिक जागांसह पूर्ण बहुमत मिळवत तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील.”
शाहंनी मांडलं हिमंता सरकारच्या कामाचं गणती –
शाह यांनी मे, 2021 मध्ये हिमंता बिस्वा सरमा मुख्यमंत्री झाल्यानंतर, भाजपच्या नेतृत्वाखालील आसाम सरकारने केलेल्या कामांवर तसेच सुरू करण्यात आलेल्या योजनांवर प्रकाश टाकला. ते म्हणाले, “मी 2016 मध्ये इशान्येत भाजपची विजय यात्रा सुरू केल्याबद्दल आसामच्या जनतेचे आभार मानतो. आता राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) आणि सहकारी या भागातील सर्वच राज्यांमध्ये सत्तेवर आहेत. तर गेल्या काही वर्षांपूर्वी काँग्रेस हा इशान्येतील सर्वात मोठा पक्ष होता जो आता पूर्णपणे साफ झाला आहे.”
‘राहुल गांधींच्या आईनेही पंतप्रधान मोदींना शिव्या दिल्या, पण…’ –
अमित शाह पुढे म्हणाले, ‘राहुल गांधींच्या आईनेही पंतप्रधान मोदींना शिव्या दिल्या, पण काहीही झाले नाही. काँग्रेसचे लोक पंतप्रधानांची कबर खोदण्याचे वक्तव्य करतात. पण, देशातील प्रत्येक नागरिक पंतप्रधान मोदींना दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा देतो. ते (विरोधक) पीएम मोदींबद्दल जितके वाईट बोलत राहतील, तितकी भाजप वाढेल. पंतप्रधान मोदी तिसऱ्यांदा पूर्ण बहुमताने सरकार स्थापन करणार आहेत,’ असा विश्वासही त्यांनी बोलून दाखवला.