स्थैर्य, दि.२०: अॅमेझॉनच्या ऑनलाईन डिजिटल शॉपिंग अॅपमध्ये मराठी भाषेचा समावेश करण्यात यावा अशी मागणी मनसेकडून करण्यात आली होती. या मनसेच्या मागणीचा अॅमेझॉनचे सर्वेसर्वा जेफ बेझोस यांनी दखल घेतली आहे. यासंदर्भात मनसेला एक अधिकृत ई-मेल पाठवण्यात आला आहे. अॅमेझॉनचे एक शिष्टमंडळ आज मुंबईत दाखल झाले आहे. ते मनसेच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेणार आहे.
मनसेचे अखिल चित्रे यांनी अॅमेझॉनला मराठी भाषेच्या वापराविषयी ई-मेल पाठवला होता. बेजॉस यांच्या वतीने ‘अॅमेझॉन.इन’च्या जनसंपर्क विभागाने या इमेलला प्रतिसाद दिला आहे. ‘बेजॉस यांना आपला मेल मिळाला आहे. अॅमेझॉन अॅपमधील त्रुटींमुळे आपल्याला जो मनस्ताप झाला, त्याबद्दल आम्ही दिलगीरी व्यक्त करतो. संबंधित विभागाला तुमच्या तक्रारीबद्दल कळवण्यात आली असून लवकरच त्यावर कार्यवाही केली जाईल, असे अमेझॉनने स्पष्ट केले आहे.
दरम्यान मनसेचे अखिल चित्रे यांनी ट्विट केले की, ‘ॲमेझाॅनच्या डिजिटल सेवेत (Trading App) मराठीला प्राधान्य देण्याच्या मनसेच्या आग्रही मागणीची ॲमेझाॅनचे संस्थापक जेफ बेझॉस ह्यांच्या प्रतिनिधींनी घेतली दखल. अमेझॉनचं शिष्टमंडळ आज मुंबईत… राजसाहेब म्हणतात तसं… तुम्ही तुमच्या भाषेवर ठाम असाल तर जग तुमची दखल घेतं.’
15 ऑक्टोबर रोजी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी अॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट या ऑनलाईन शॉपिंग कंपन्यांच्या मुंबईतील संबंधित कार्यालयांना भेटी दिल्या होत्या. तसेच मराठी भाषेच्या वापराबाबत मागणी केली होती आणि तसे न झाल्यास आंदोलनाचा इशाराही देण्यात आला होता.